अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांचे बंधू आनंदराव पाटील यांचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 08:40 PM2020-02-02T20:40:28+5:302020-02-02T20:44:44+5:30
खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्र वादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला.
सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्र वादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांचा खून केला. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खटाव-भिलवडी रस्त्यावर ही घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांचे ते बंधू होत.
या रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील परतत असताना त्यांच्यावर सत्तुराने हल्ला करण्यात आला. पाटील यांच्या डोक्यावर, तसेच हातावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने व डोक्यातील वार वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हल्ल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकही मागविण्यात आले होते. दरम्यान, पाटील यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, राजकीय पदाधिका-यांसह गावक-यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करण्यात आली, तसेच या खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी केली आहे.