अजित पवारांनी आज शरद पवारांवर चांगलेच शरसंधान साधले. काँग्रेसविरोधी भुमिका ते शरद पवारांच्या अगदी परवाच्या राजीनामा नाट्यावर अजित पवारांनी तोंडसुख घेतले आहे. अजित पवारांच्या वादळी भाषणानंतर एक मोठी अपडेट हाती येत आहे. अजित पवारांनी कायदेशीर लढाई सुरु केली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने लढण्यासाठी अजित पवार निघाले आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्हावर दावा केला आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी दावा केल्याचे वृत्त एनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. निवडणूक आयोगाला अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी याचिका प्राप्त झाली आहे. तर जयंत पाटील यांनी ९ मंत्र्यांच्या अपात्रतेची कारवाई करणारी कॅव्हेट निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहे. तसेच राष्ट्रवादीचे झाले तर अशा चिंतेत कार्यकर्ते आहेत. जे गेल्या १ वर्षात झाले तेच आता पुन्हा गिरविले जात आहे. यामुळे पुढचे डावपेच काय असतील, कोण काय कार्ड खेळेल यावर पुढील राजकारण रंगणार आहे.