अजित पवारांकडून विधानसभेच्या ९० जागांवर दावा, शिंदे गटाचं टेन्शन आणखी वाढणार
By बाळकृष्ण परब | Published: July 5, 2023 04:54 PM2023-07-05T16:54:46+5:302023-07-05T16:55:39+5:30
Ajit Pawar: अजित पवार यांनी आज आक्रमक भाषणाने शरद पवार गटाला लक्ष्य केले असले तरी अजितदादांनी केलेल्या काही विधानांमुळे भाजपासह सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
थेट शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० हून अधिक आमदारांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान, यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार यांनी आक्रमक भाषणाने शरद पवार गटाला लक्ष्य केले असले तरी अजितदादांनी केलेल्या काही विधानांमुळे भाजपासह सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
आज वांद्रे येथील एमआयटी इन्स्टिट्युट येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार यांची निवृत्ती, भाजपाबरोबर केलेल्या गुप्त वाटाघाटी यासह अनेक मुद्द्यांवरून आक्रमक भाषण दिले. यावेळीच अजित पवार यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत ९० जागा लढवण्याची घोषणा केल्याने भाजपा आणि विशेष करून शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत मिळून लढवणार आहोत. या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या काही जागा आपल्याला मिळतील. तसेच विधानसभेच्या आपल्या असलेल्या ५४ जागांसह एकूण ९० जागा मिळतील, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
मात्र हा दावा शिंदे गटाच्या चिंता वाढवणारा आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि समर्थक १० असे मिळून ५० आमदार आहेत. तसेच विधासभा निवडणुकीसाठी १०० हून अधिक जागांवर शिंदे गटाकडून दावा करण्यात येत होता. एकूण २८८ जागा असलेल्या विधानसभेत सध्या भाजपाचे १०५, भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आणि इतर असे ८ ते १०, शिंदे गटाचे ४० आणि समर्थन देणारे १० आमदार असे बलाबल आहे. त्यात आता अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांची भर पडणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरू भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
त्यातच आज अजित पवार यांनी ९० जागांवर दावा केल्याने तो दावा मान्य झाल्यास विधानसभेच्या १९८ जागा उरतील. त्यात भाजपाने गेल्या निवडणुकीत १६० च्या आसपास जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपाला त्यापेक्षा कमी जागा लढवणं शक्य नाही. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदेगटासाठी केवळ ४० ते ५० जागा उरतील. अशा परिस्थितीत आपल्यासोबतच्या ५० आमदारांनाकशी संधी द्यायची हा प्रश्न शिवसेना शिंदे गटासमोर उपस्थित होण्याची शक्यता आहे. तसेच तिन्ही पक्षांनी तडजोड करून जागा लढवायच्या म्हटल्या तरी तिघांचेही सध्याचे संख्याबळ आणि दावे पाहता तिन्ही पक्षांचं समाधान होईल, असा तोडगा निघणे सध्यातरी कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष जागावाटपा वेळी भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद होऊ शकतात. त्यामुळे या संभाव्य अडचणीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना तोडगा काढावा लागणार आहे.