महायुती अन् कुटुंबातही अजित पवारांची कोंडी! विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीत ठोकला शड्डू
By यदू जोशी | Published: March 21, 2024 09:31 AM2024-03-21T09:31:19+5:302024-03-21T09:32:27+5:30
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे.
मुंबई : बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट असताना अजित पवार यांची इथे कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न मित्रपक्षांच्या नेत्यांकडूनच केले जात आहेत.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी स्वत: बारामतीतून लढणार असे आधीच जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी शिवतारे यांना वर्षा बंगल्यावर बोलावून अजित पवार यांना सहकार्य करा, असे बजावले तरी शिवतारेंनी सहकार्याचा हात अद्यापही समोर केलेला नाही. आता बदला घेण्याची हीच वेळ आहे अशी साद शिवतारे यांनी माजी मंत्री व पवार विरोधक अनंतराव थोपटे यांना घातली आहे.
माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे अजित पवार यांचे विरोधक मानले जातात. त्यांचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव करण्यात अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. आता पाटील यांचे समर्थक सुनेत्रा पवार यांच्याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असेल.
कुटुंबातही एकाकी
अजित पवार हे कुटुंबातही एकाकी पडल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार आहेत. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास, पुतणे आ. रोहित पवार हे सुप्रिया यांच्या प्रचारात आहेत. संर्व कुटुंब सुप्रिया यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे.
महायुतीला मजबूत करण्यासाठी जे थोडेफार मतभेद आहेत ते दूर केले जात आहेत. त्यानुसार आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे. अजित पवार गटाचे नेते जाहीर भाषणात धमक्या देतात. हे चुकीचे आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. फडणवीस यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. - हर्षवर्धन पाटील, भाजप नेते
अरे ला का रे आम्हालाही करता येते. पण, आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. महायुतीचा विजय हे आमचे लक्ष्य आहे. काही नेते वेगळे बोलत आहेत. त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना सांगितले आहे. त्यानुसार ते सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री