‘कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल’, अजितदादांचं फडणवीसांना थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:04 PM2022-06-16T16:04:06+5:302022-06-16T16:04:40+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे.
मुंबई - राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा भाजपाने शिताफीने जिंकल्याने राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. त्यामुळे अगदी चार-पाच दिवसांवर आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याचं कौतुक झालं होतं. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आहे. कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे नाही हे विधान परिषद निवडणुकीत कळेल, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल काठावर लागला आहे. पण अनुभवातून माणूस शिकतो. एखादी निवडणूक लढत असताना ज्यांच्या बाजूने निकाल लागतो त्यांच्याबाजूने कौशल्य असं म्हटलं जातं, तर जे पराभूत झाले ते कमी पडले असं म्हणतात. राज्यसभा निवडणुकीनंतरही तसंच समजलं गेलं. मात्र आता आता या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडे कौशल्य नाही हे जनतेला कळेल, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्या राज्यात असलेल्या समिकरणांनुसार दहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजपाचे चार, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदान निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा अपक्ष आणि इतरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, अशा परिस्थितीत एक एक मत निर्णायक ठरेल.