मुंबई – एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि पंतप्रधानपदाची संधी यावर भाष्य केले. काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही असा आरोप मोदींनी खासदारांच्या बैठकीत केला. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात शरद पवार यांना न मिळालेल्या पंतप्रधानपदाच्या संधीवर प्रतिक्रिया उमटू लागल्या. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेले शरद पवार पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकले नाही अशी खंत अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आता अजित पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील ४८ पैकी ३८ खासदार आम्ही निवडून आलो होतो. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी पक्षांतर्गत मतदान झाले तेव्हा शरद पवारांना पसंती दिली होती. इतर राज्यातील खासदारांनी पीवी नरसिम्हा राव यांना पाठिंबा दिला. त्यावेळी पंतप्रधान म्हणून राव आले त्या मंत्रिमंडळात शरद पवारांना संरक्षण खाते देण्यात आले. पंतप्रधानपदाचे प्रसंग २-३ वेळा आले होते. पण अपेक्षित यश आले नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच मोदींनी त्यांचे मत बैठकीत मांडले आहे. मोठे नेते मत मांडतात त्यावर बोलणे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी बोलणे उचित नाही. व्यक्तिगत अनेकदा शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी आली होती. १९९१ मध्ये मला बारामतीतून लोकसभेचे तिकीट मिळाले होते. मी खासदार म्हणून निवडून आलो होतो. राज्यातील ३८ खासदारांनी पवारांना पंतप्रधान बनवावं अशी मागणी केली होती. परंतु ती पूर्ण झाली नाही असंही अजित पवारांनी म्हटलं.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
भाजपा काँग्रेससारखा अहंकारी पक्ष नाही. २०१४ ते २०१९ दरम्यान शिवसेना महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी होता; पण ‘सामना’मधून आमच्या सरकारवर सतत बिनबुडाची टीका करून अनावश्यक वाद निर्माण केले गेले. तरीही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही नव्हे तर शिवसेनेने आमची युती तोडली. काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवार कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.