अकाेला : अजित पवार मुख्यमंत्री हाेण्याचे स्वप्न बघत आहेत. तसे स्वप्न त्यांना दाखविलेही जात आहे; परंतु त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी येथे लगावला. अजित पवार यांची राष्ट्रवादीत घरवापसी होणे आता शक्य नाही, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.सहकार नेते डाॅ. अण्णासाहेब काेरपे यांचा जन्मशताब्दी वर्ष समाराेप व त्यानिमित्त आयाेजित सहकार मेळाव्यासाठी अकाेल्यात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, देशात भाजप विराेधात चित्र असून, सद्य:स्थितीत ७० टक्क्यांपेक्षा अधिक राज्यांत त्यांची सत्ता नाही, ‘इंडिया’ आघाडीला चांगले दिवस आहेत. म्हणूनच २०२४ मध्ये आमचे सरकार आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राज्यात शेतकरी कामगार पक्ष, डावे यांनाही सोबत घेण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही साेबत घेण्यास आमचा विराेध नाही.छगन भुजबळांच्या आरोपांवर ते म्हणाले, आमच्यातील काही लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता; पण त्यांनी स्वीकारला नाही. यासंदर्भात आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचे पवार म्हणाले.
कर्जबुडव्यांचे कर्ज माफ होतेय...शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी त्यावेळी आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे ६७ हजार काेटी रुपयांचे कर्ज माफ केले; परंतु आताचे सरकार हजाराे काेटींचे कर्ज बुडविणाऱ्यांचे कर्ज माफ करीत असल्याचा आराेप पवार यांनी सहकार मेळाव्यात बोलताना केला.