पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 06:37 AM2023-07-15T06:37:46+5:302023-07-15T06:54:12+5:30
तीन पक्षांमध्ये संतुलन आणि समन्वय राखण्यासाठी ठरला फॉर्म्युला
मुंबई - वित्त विभागाच्या फाइल्स वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेसाठी जाणार नाहीत. त्या व्हाया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातील असे ठरविण्यात आले आहे. निधीवाटपासह वित्त विभागाच्या विविध निर्णयांमध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त खाते अजित पवार यांच्याकडे देताना ज्या वाटाघाटी झाल्या त्यात असे ठरले की अजित पवारांकडून वित्त विभागाच्या ज्या फाइल्स मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जातील त्या सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जातील.
अजित पवार यांना वित्त खाते देण्यास भाजप, शिवसेनेच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवत तशी भावना आपल्या नेतृत्वाकडे बोलून दाखविली होती. पवार हे आमदारांना वा मतदारसंघांच्या विकासासाठी निधी देताना राष्ट्रवादीच्या आमदारांना बळ देतील आणि आपली कोंडी होईल अशी भीती काही आमदारांनी शिंदे-फडणवीस यांच्याकडे बोलून दाखविली होती.
वाटाघाटीत काय ठरले?
खातेवाटपाची जी चर्चा शिंदे-फडणवीस- पवार यांच्यात झाली त्यावेळी पवार यांनी आपण तीन पक्षांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वच मतदारसंघांना न्याय देऊ अशी हमी दिली. मात्र, निधीवाटपावरून रोजच्या रोज काही कटकटी, तक्रारी होणे आणि त्यातून अंतर्गत ताणतणाव होणे हे टाळण्यासाठी आता हा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. फडणवीस आणि पवार यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्याचा विकासकामांसाठी फायदाच होईल, असे मानले जात आहे.
पवार-फडणवीस मग शिंदे
पवार यांना वित्त खाते दिल्याने निर्माण होणाऱ्या नाराजीवरील उपाय म्हणून आणि निधीवाटपात संतुलन राहावे यासाठी आता वित्तच्या फायलींचा प्रवास अजित पवार-देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे असा करण्याचे ठरले आहे.
खातेवाटपाआधीच अजित पवारांनी घेतला वित्त विभागाचा आढावा
राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र खातेवाटपावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब करण्यापूर्वीच अजित पवारांनी या खात्याचा कारभार सुरू केला. शुक्रवारी सकाळीच अजित पवार मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी वित्त व नियोजन विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या विभागाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर आणि अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता उपस्थित होते.
संध्याकाळी राज्यपालांनी खातेवाटपावर शिक्कामोर्बत केल्यानंतर अजित पवार यांनी अधिकृतपणे मंत्रालयात जाऊन वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनाचे काम सुरू असल्याने मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील ५०३ क्रमांकाच्या दालनात तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय, वित्त खात्याची काळजी नाही : केसरकर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त खाते दिले तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असेल, असे अजित पवार यांनीच अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे वित्त खात्याची शिवसेनेला काळजी नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मागील सरकारमध्ये काय नाराजी होती हे अजित पवारांनी समजून घेतले आहे. तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल. मंत्री अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते काढून राष्ट्रवादीला दिल्याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सत्तारांशी बोलूनच कृषी खाते राष्ट्रवादीला दिले. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. संजय राठोड यांच्याशीदेखील चर्चा करून खाते बदलण्यात आले.