मुंबई : शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीत २२ जागा लढविल्या होत्या. त्यामुळे आतादेखील तेवढ्याच जागा मिळाव्यात यासाठी आग्रही असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. एखाद्या पक्षाने एखाद्या जागेचा आग्रह करणे म्हणजे नाराजी नव्हे, असे ते म्हणाले. या शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
रामटेक, बुलढाणा, यवतमाळ वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, शिर्डी, छ. संभाजीनगर, ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, मावळ, धाराशिव, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे.
अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी -महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू झाली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी ५ आणि ६ मार्च रोजी मुंबईत बैठक बोलवली आहे.
आढावा बैठकीत ५ मार्च रोजी गोंदिया-भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व मुंबई, हिंगोली, धाराशिव, रायगड या सात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. तर ६ मार्चला कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरुर, बारामती, परभणी, अहमदनगर, गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल.