Ajit Pawar: अजित पवारांना ‘प्राप्तिकर’चा जबरदस्त धक्का; नातेवाईकांच्या १३०० कोटींच्या मालमत्तांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:46 AM2021-11-03T06:46:40+5:302021-11-03T06:48:19+5:30
Ajit Pawar Income Tax: खुलाशासाठी ९० दिवसांची मुदत. नोटिसा जारी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे मुंबईतील कार्यालय, जरंडेश्वर साखर कारखाना, नवी दिल्लीतील फ्लॅट आदी वास्तूंचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्राप्तिकर विभागाने ऐन दिवाळीत मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पाच निकटवर्तीयांच्या तब्बल १ हजार ३०० कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस विभागाने जारी केली आहे. ही मालमत्ता बेनामी पद्धतीने जमविल्याचा विभागाला संशय असून त्यांच्या व्यवहारांबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नोटिसा जारी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे मुंबईतील कार्यालय, जरंडेश्वर साखर कारखाना, नवी दिल्लीतील फ्लॅट आदी वास्तूंचा समावेश आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित मालमत्तांबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न केल्यास प्राप्तिकर विभाग त्यावर टाच आणू शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बेनामी गुंतवणूक केल्याचा संशय
n प्राप्तिकर विभागाने ऑक्टोबरमध्ये अजित पवार यांच्याशी संबंधित दोन रिअल इस्टेट ग्रुप, पार्थ पवार यांच्या मालकीची अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पवारांची बहीण व निकटच्या नातेवाइकांची घरे आणि कार्यालये अशा ७० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती.
n त्यानंतर मंगळवारी त्यापैकी पाच मालमत्तांबाबत नोटीस काढण्यात आली. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत १ हजार ३०० कोटींहून अधिक आहे. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेनामी गुंतवणूक केल्याचा संशय आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित काेणत्याही संपत्तीवर प्राप्तिकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भात अजित पवार यांना नाेटिसही मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांत येत असलेले वृत्त वस्तुस्थितीशी विसंगत आणि खाेडसाळपणाचे आहे. -ॲड. प्रशांत पाटील, अजित पवार यांचे वकील
-सविस्तर वृत्त/स्टेट पाेस्ट