विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच इच्छुक, आमदार, नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. दोन पक्ष फुटल्याने लोकसभेला मोठी चुरस निर्माण झाली होती. आता विधानसभेलाही उद्धव ठाकरे, शरद पवारांना सोडून गेलेल्या आमदारांच्या मनात चांगलीच धाकधूक सुरु झाली आहे. अशातच लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघातून मोठी अपडेट येत आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे.
बबन शिंदे यांनी आपण यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत आपल्या मुलाला पुढे केले आहे. मला तुम्ही सहावेळा आमदार केले, आता माझ्याऐवजी मुलाला रणजित शिंदेना संधी द्या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
माढा मतदारसंघात शरद पवारांचे वर्चस्व आहे. तरीही बबन शिंदे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे खासदार पडल्यानंतर बबन शिंदे यांनी पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यासाठी ते वारंवार शरद पवारांची भेट घेत आहेत. आता शिंदे कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळवितात अशी चर्चा सुरु असताना त्यांनी आपल्या मुलाला उमेदवार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनावेळी बबन शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. आता रणजितला संधी देताना तो कसा काम करतो ते पहा, काम नाही आवडले तर पुढच्यावेळी त्याला मत द्यायचे की नाही ते ठरवा. मग पुढच्यावेळी वेगळा विचार करावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.