Yugendra Pawar: 'मोठ्या साहेबां'कडून अनेक गोष्टी शिकलोय, जे घडलंय ते...; अजित पवारांच्या पुतण्याची खास मुलाखत
By प्रविण मरगळे | Published: February 22, 2024 08:54 AM2024-02-22T08:54:58+5:302024-02-22T08:59:03+5:30
पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आणखी एक युवा चेहरा राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या नव्या नेतृत्वाला शरद पवारांकडून बळ मिळण्याची शक्यता आहे.
प्रविण मरगळे
पुणे - Yugendra Pawar ( Marathi News ) महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ५ दशकापासून पवार कुटुंबाचा दबदबा कायम राहिलाय. मात्र काही महिन्यांपूर्वीच पवार कुटुंबाच्या एकीला तडे गेलेत. शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्याविरोधात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षातील या फुटीचे पडसाद पवार कुटुंबातही दिसू लागलेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार हे शरद पवारांसोबत राहिलेत. तर अजित पवार, पार्थ पवार हे वेगळे झालेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. त्यात आता आणखी एक पवार बारामतीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधू असून त्यांचा मुलगा युगेंद्र पवार शरद पवारांसोबत दिसणार असं बोलले जात आहे. युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली आणि युवकांशी संवाद साधला त्यामुळे या चर्चा जोर धरू लागल्या. बारामतीच्या राजकारणात युगेंद्र पवार नावाचा तरुण चेहरा शरद पवार रिंगणात उतरवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच युगेंद्र पवार यांच्याशी 'लोकमत ऑनलाइन' विशेष संवाद साधला आहे.
तुम्ही सक्रीय राजकारणात उतरणार आहात का?
आठवड्याला ३-४ दिवस मी बारामतीतच असतो. तिथे सामाजिक काम करत असतो. बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये मी संचालक आहे. शरयू फाऊंडेशन, कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून माझे काम सुरू असते. आज पक्षाच्या नवीन कार्यालयाला मी भेट दिली. अद्याप सक्रीय राजकारणात उतरायचा विचार नाही. परंतु जर लोकांची इच्छा असेल तर कदाचित ते होऊ शकते. पुढे काही होईल आता सांगता येत नाही.
काका-पुतण्याच्या जोडीत तुम्ही काकांऐवजी आत्या-आजोबांसोबत जाताय, त्यामागचा विचार काय?
मी कुणासोबत जातोय किंवा नाही असं काही नाही. परंतु पक्षाचे २ गट होण्यापूर्वीपासून मी मोठ्या साहेबांसोबत फिरतोय. माझे कॉलेज झाल्यापासून साहेबांच्या सानिध्यात राहिलोय. त्यांच्यासोबत फिरत असल्याने अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्यामुळे स्वाभाविक माझा जास्त वेळ हा साहेबांसोबत गेलाय.
शरद पवार-अजित पवार यांच्यातील दुराव्यामुळे बारामतीतलं राजकारण बदललंय त्याबाबत तुम्हाला काय वाटतं?
सध्या बारामतीकरांच्या मनात गोंधळाची स्थिती आहे. काय करावे, कुणाच्या बाजूने जावं अशी परिस्थिती आहे. बारामतीत याआधी असं कधी घडलं नव्हते. जे झालंय त्यावर आता काय बोलणार. जे घडलंय ते कुणालाही आवडलं नाही. जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर चांगलीच बाब आहे. सगळे खुश होतील. पण पुढे काय होईल मला माहिती नाही. एखाद्यावेळी पुढची पिढी एकत्र येऊ शकते.
अजित पवार, पार्थ पवारांशी तुमचं नातं कसं आहे? राजकारणामुळे हे नातं बदलेल का?
अजितकाका, पार्थ पवार यांच्यासोबत माझे नाते खूप चांगले आहे. राजकारणामुळे त्यात काही बदल होईल मला वाटत नाही. माझ्याबाजूने हे नाते कधीही बदलणार नाही. शेवटी आमचे कौटुंबिक नाते आहे. आम्ही लहानपणापासून एकत्रित आहोत. आम्ही नेहमी राजकारण, विचार, मते एकाबाजूला आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक नाते ठेवले आहे. त्यामुळे राजकारण आणि कौटुंबिक नाते आताही वेगळे राहायला हवे.
पवारांची तिसरी पिढी पार्थ आणि रोहित पवारांकडे आपण कसं पाहता?
पार्थ आणि रोहित हे दोघेही माझे भाऊ आहेत. दोघेही माझ्यासाठी सारखेच आहे. त्यामुळे आमच्यात फार काही वेगळे नाही.
राजकारणातील एन्ट्रीबाबत जी चर्चा सुरू आहे त्यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय?
मी याआधीही अनेकदा पक्ष कार्यालयात गेलो आहे. परंतु आज एवढी चर्चा होईल मला वाटलं नव्हते. आता राजकीय एन्ट्रीबाबत कुणाची काय प्रतिक्रिया आहे हे कळेल. मी साहेबांचा फॅन आहे हे सगळ्यांना घरात माहिती आहे. त्यामुळे घरच्यांना काही वाटत नाही. मी लहानपणापासून शरद पवारांना खूप मानतो. मी साहेबांसोबत महाराष्ट्रात फिरलोय, परदेशातही फिरलोय. मला खूप वेळ त्यांनी दिलाय. त्यांच्याकडून मी प्रचंड शिकलो आहे.
एक युवक म्हणून सध्याच्या राजकारणाकडे कसं पाहता?
मला सध्याचे राजकारण आवडत नाही. मी पूर्वीचे राजकारण पाहिले आहे. मला राजकारणात आधीपासून रस होता. राजकीय कुटुंबातून येत असल्याने प्रत्येक राजकीय घडामोडींकडे पाहत आलोय. पूर्वीचे राजकारण बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि मोठे साहेब यांची मैत्री कशी होती हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकमेकांविषयी आदराची भावना होती हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ते दिवस यावेत. विरोधक वैचारिक हवेत. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्वीपासून एक परंपरा आहे ती कायम राहायला हवी.
जर तुम्ही राजकारणात आलात तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर विशेष लक्ष द्याल?
बघू, आज तरी ते सांगणे अवघड आहे. पण राजकारण नाही, मी समाजकारण करत आलोय. मला कृषी आणि शिक्षण या २ गोष्टींवर जास्त लक्ष ठेवायला आवडते. आजही मी क्षेत्रात काम करतोय. भविष्यात संधी मिळाली तर या क्षेत्रात काम करायला आवडेल.