अजितकाकांना धक्का, सख्खा पुतण्या करणार शरद पवार गटात राजकीय एन्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:05 AM2024-02-21T10:05:33+5:302024-02-21T10:12:28+5:30
राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली.
पुणे - Yogendra Pawar Update ( Marathi News ) राजकारणात कधी कोण कुणाला शह-काटशह देईल सांगता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ नंतर बरीच उलथापालथ झाली. त्यात राज्यातील २ प्रमुख पक्ष फुटले. इतकेच नाही तर पवार कुटुंबातही राजकीय फूट पडल्याचं दिसून आले. त्यातच आता अजित पवारांच्या पुतण्यानं शरद पवार गटात राजकीय एन्ट्रीचा चंग बांधल्याचे संकेत मिळत आहेत.
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांसोबत राहणार असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीत दुफळी झाल्यानंतर पवार कुटुंबालाही त्याची झळ बसली. अजित पवार, पार्थ पवार एका बाजूला गेले तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार शरद पवारांसोबत राहिले. त्यात आता अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार काकांना शह देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बारामतीतल्या शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार हे युवकांशी संवाद साधणार आहेत. युगेंद्र पवार राजकारणात येतील अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. त्यात युगेंद्र पवार आता सक्रीय राजकारणात उतरून युवकांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ते शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसते.
युगेंद्र पवार हे बुधवारी बारामतीतील पक्ष कार्यालयात शरद पवारांचे हात देशात बळकट करण्यासाठी आणि युवक, जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात आणखी एक दादा सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यात अजित पवार दरवेळी लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे शरद पवारांनीही बारामती गड आपल्याच ताब्यात ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत युगेंद्र पवार हे राजकारणापासून दूर होते. मात्र अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड केल्यानंतर युगेंद्र पवार चर्चेत आलेत.
२०१९ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला होता. त्यावेळी अजित पवारांची नाराजी दूर करून त्यांना पुन्हा पक्षात आणण्यामध्ये श्रीनिवास पवार यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा शरद पवारांसोबत आले होते. श्रीनिवास पवार हे उद्योजक आहेत. त्यांना राजकारणात फारसा रस नाही. परंतु त्यांचे सुपुत्र युगेंद्र पवार आता सक्रीय राजकारणाकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अजित पवार कुटुंबामध्येही राजकीय फुटीचे पडसाद दिसून येत आहेत.