'CM वॉर रुम'सारखाच अजित पवारांचा 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष', कसं होणार काम? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 01:09 PM2023-08-12T13:09:22+5:302023-08-12T13:10:15+5:30

उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'ची बैठक ही २४ वी बैठक होती.

Ajit Pawar's 'Project Monitoring Room' similar to 'CM War Room', how will it work? Read on | 'CM वॉर रुम'सारखाच अजित पवारांचा 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष', कसं होणार काम? वाचा

'CM वॉर रुम'सारखाच अजित पवारांचा 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष', कसं होणार काम? वाचा

googlenewsNext

मुंबई  - अजित पवार हे प्रशासनावर उत्तम पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अजित पवारांनी मंत्रालयात बैठकांचा धडाका लावला. त्यात आता मुख्यमंत्री वॉर रुम समांतर कक्ष बनवण्यात आला आहे. ज्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विशेष लक्ष असेल.

कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या पायाभूत विकासप्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तात्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'च्या माध्यमातून कार्यरत आहेत. हा कक्ष मुख्यमंत्री शिंदेंच्या 'वॉर रुम'ला सहाय्यक, पुरक भूमिका बजावत आहे. 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'चा उद्देश राज्याच्या विकासकामातील अडथळे दूर करुन विकासप्रक्रिया गतिमान करणे, महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवणे हा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'चा माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व विकास प्रकल्पांवर बारकाईने लक्ष केंद्रीत करत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'ची बैठक ही २४ वी बैठक होती. या बैठकीत कोकणातील पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, सातारा-अलिबागची वैद्यकीय महाविद्यालये, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, 'सारथी'चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूरचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदीं विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.

विकासकामतील अडथळे दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देणे या कक्षातून साध्य होते. दर पंधरवड्याला नियमितपणे कक्षाची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातील. विकासप्रक्रिया गतिमान केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी 'वॉर रुम'च्या माध्यमातून निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी, 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष' सहायकाची भूमिका यापुढेही पार पाडत राहील. राज्यातील विकासप्रकल्पांना केंद्राची मंजूरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, 'वॉर रुम'चे प्रमुख राधेशाम मोपलवार हे सर्वच जण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून 'वॉर रुम' तसेच 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा'च्या माध्यमातून योगदान देत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चितंच दिसतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला आहे. विकासप्रक्रिया गतिमान करण्याच्या या प्रयत्नांकडे वस्तुनिष्ठ आणि सकारात्मकपणे पहावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून स्पष्ट केले आहे.

Web Title: Ajit Pawar's 'Project Monitoring Room' similar to 'CM War Room', how will it work? Read on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.