कुजबुज: अजित पवारांचा पुन्हा शपथविधी? NCP पदाधिकाऱ्यांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 07:23 AM2023-09-23T07:23:15+5:302023-09-23T07:23:42+5:30
आमदार अपात्रतेप्रकरणी आता लवकर निकाल लागून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या याचिकेबाबत विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दात ताशेरे ओढल्याने अजित पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी आता लवकर निकाल लागून शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील व अजित पवार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात पुन्हा रंगू लागली आहे. यापूर्वी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी बॅनर्सही लावले होते. त्यामुळे अजित पवारांचा पुन्हा शपथविधी व्हावा यासाठी त्यांचे पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
एक हजार कोटींची चुरस
स्वातंत्र्यानंतरही मूळच्या आदिवासी गावपाड्यांना आजपर्यंत रस्ते मिळालेले नाहीत. त्यासाठी सतत पाठपुरावा झाला मात्र दुर्दैवाने मुंबई-पुणे महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून शोककळा पसरली. डोंगरवाटेने, भरपावसात पायी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलैमध्ये इर्शाळवाडीचे घटनास्थळ गाठले होते. सचिवही त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री व सचिव यांच्या चालण्याच्या या अनुभवामुळे १६ जिल्ह्यांत दुर्गम भागातील गावे, खेडी, पाड्यांना तीन हजार किमीचे रस्ते मंजूर झाले आहेत. या रस्त्यांच्या पाच हजार कोटींच्या खर्चापैकी एक हजार कोटीचा निधी त्वरित मिळविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी राजकारण्यांमध्ये चुरस सुरू आहे.
नार्वेकर साहब तुम्हारा जवाब नही
नवी मुंबईत गणेशाेत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी नेमलेले आहेत. यावर आयुक्त राजेश नार्वेकर हे स्वत: देखरेख ठेवून आहेत. यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील विसर्जन मार्गांवरील सर्वच रस्ते खड्डेमुक्त झाले. नवी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही गणेशोत्सवा काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यांच्या आवाहनानुसार मुस्लीम बांधवांनी गणेशाेत्सवानंतर ईदचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजेश नार्वेकर आणि मिलिंद भारंबे यांना उद्देशून नवी मुंबईकर साहब तुम्हारा जवाब नही, असे म्हणत आहेत.
मोठ्यांचा नेम नाही भाऊ
राजकारणापलीकडे मैत्री जपणे ही महाराष्ट्राची संस्कृती म्हटली जात असली तरी राजकीय पक्षांमध्ये एकमेकांविरोधात होत असलेली टीका आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप पाहता राजकारणाची पातळी घसरल्याचे सदैव पाहायला मिळते. मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्यावरून मनसेने थेट सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. परंतु, त्याच चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर डोंबिवली शहरात लागल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचे अलीकडेच दर्शन घेतले. एकूणच ‘मोठ्यांचा काही नेम नाही भावा’ अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे.