मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत तब्बल ४० आमदारांना स्वत:च्या बाजूने वळवत राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आणले. शिंदेसंह समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे २ गट पडले. या घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र उद्धव ठाकरेंसोबत दुरावा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी जवळीक साधली आहे. राज्यातील सत्तासंघर्षात शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये २ वेळा फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर अलीकडेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी घडल्या. पत्रकारांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संबंधाकडे कसं पाहता असा प्रश्न विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला असता, अजित पवार म्हणाले की, "चांगले आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. समाधान वाटतं अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
शिंदे गट-मनसे एकत्र येण्याची चर्चाराज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता शिंदे सेना आणि मनसे महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचेही बोलले जाते. दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगण्यास सुरुवात झाली. आता दसरा मेळाव्यावरून ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले. येत्या महापालिका निवडणुका शिंदे सेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत. काही महिन्यांपासून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले, त्यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरला आणि त्याचे परिणामही दिसून आले. यातून मनसेचे पदाधिकारी पुन्हा एकदा कामाला लागले.
शिंदे यांच्याकडे संघटन कौशल्य असले तरी करिष्मा नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा शिंदे यांच्या संघटन कौशल्यात साखरेसारखा विरघळून ठाण्यात शिवसेनेकरिता यशाचा दुग्धशर्करा योग जमून येत होता. उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावल्यामुळे शिंदे यांना ‘ठाकरे’ आडनावाचा करिष्मा लागला तर ती गरज राज ठाकरे पूर्ण करतील, अशी कदाचित त्यांची अपेक्षा आहे. शिंदे व राज हे दोघेही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेचा आपण पाठपुरावा करीत असल्याचे सांगतात. त्यामुळे शिंदे यांना ठाकरेंचा करिष्मा मिळेल व मनसेला सत्ताधारी पक्षाकडून रसद प्राप्त होईल असं बोललं जात आहे.