लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:19 AM2024-09-16T11:19:30+5:302024-09-16T11:25:00+5:30

Ajit Pawar : लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar's reply to Sharad Pawar's statement regarding safety of Ladki Bahin; Said, 100 percent... | लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेबाबत शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, १०० टक्के…

मुंबई : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देऊन काही होणार नाही. त्यांची अब्रू वाचविणे गरजेचे आहे, असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकाराच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या शैलीत उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, "हो, हे १०० टक्के बरोबर आहे. कोणाचेही सरकार असेल, बहिणींची अब्रू वाचविणे हे महत्त्वाचेच आहे. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री, गृहमंत्री झाले, जेवढे सरकारे आली, त्यांना प्रत्येकांनाच कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न हे प्रत्येक सरकार करत असते. आम्ही पण करत आहोत, असं म्हणत अजित पवार यांनी महिला सुरक्षेबाबत भाष्य केलं.

अजित पवार यांनी आज मुंबईत लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असं अजित पवार म्हणाले. तसंच, एक उदाहरण देताना महिला सुरक्षासंदर्भात गैरफायदा घेण्याचे प्रकारही घडतो असेही सांगितले. ते म्हणाले, एका महिलेने काही दिवसापूर्वी सांगितलं गँगरेप झाला, मात्र तपासाअंती समोर आलं की तसं काही झालं नव्हतं. मात्र अशावेळी पोलिसांची संस्थेची बारामतीची बदनामी झाली, त्यामुळे अशा घटना घडता कामा नये. तक्रार आल्यानंतर एसपी आणि संबंधित हे सगळ्या प्रशासनांना ताकद लावली. त्यामुळे कारण नसताना कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नये, असं अजित पवार म्हणाले.  

लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, एक दिवस पुण्याला गेलो होतो एक दिवस बारामतीला दर्शनासाठी गेलो होतो. आज मुंबईमध्ये लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळी आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. राज्यात सुख समाधान शांती सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे, अशी मागणी बाप्पााकडे केली आहे. राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काय मदत राज्याकडून किंवा केंद्राकडून करायचे असेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या परिस्थितीमधून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

राज्यात विधानसभा निवडणूक कधी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये, स्ट्राईक रेटवरून जागावाटपासंदर्भात निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. याबाबत अजित पवार म्हणाले की, जे प्रमुख व्यक्ती आहेत, त्यांना जे काही वाटेल ते म्हणण्याचा अधिकार आहे. सगळे जण सांगतील आणि नंतर अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया दिली. तसंच, राज्यात विधानसभेची निवडणूक कधी लागणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा मला काहीच माहिती नाही. निवडणूक आयोग ज्या वेळेला निवडणुका लावतील त्यावेळेला निवडणुका असतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. किती टप्प्यात घ्यावं हा देखील त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोग ठरवेल तेव्हा निवडणूक होईल, असं अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar's reply to Sharad Pawar's statement regarding safety of Ladki Bahin; Said, 100 percent...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.