मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा का दिला, ते पुढे काय करणार, राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का, या बाबत आता तर्कवितर्क लढविले जात आहेत. काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना मावळमध्ये दारुण पराभव झाला. त्याचवेळी पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. यावरून पवार कुटुंबात सगळेच काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पेव फुटले होते. पार्थ यांच्या पराभवासाठी काही अंतर्गत दगाबाजी झाल्याची चर्चादेखील झाली.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे स्वत:च्या हातात घेतली आणि गेले काही दिवस ७९ वर्षीय पवार यांनी भाजपला स्वत:च अंगावर घेतले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांना महत्त्व दिले. त्यामुळे नाराज होऊन तर पवार यांनी आज राजीनामा दिला नाही ना, अशी चर्चा आहे.इव्हीएमच्या मुद्यावरून काका-पुतण्यामधील मतभिन्नता प्रकर्षाने समोर आली. देशभरातील काँग्रेस आघाडीच्या पराभवासाठी इव्हीएमद्वारे झालेले मतदान हेही एक कारण असल्याचे सांगत शरद पवार यांनी इव्हीएम घोटाळ्याकडे अंगुलीनिर्देश केला होता तर अजित पवार यांनी मात्र, इव्हीएमचे समर्थन केले होते. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्याच्या मुद्यावरूनही दोघांमधील मतभेद समोर आले होते. शरद पवार यांनी गेली काही महिने त्यांचे नातू रोहित पवार यांना राजकारणात पुढे आणले.अजितदादांची कारकिर्द : साठ वर्षीय अजित पवार हे पाचवेळा बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. एकदा ते बारामतीचे खासदारही होते. राज्यात उपमुख्यमंत्री पदासह वित्त, जलसंपदा, ऊर्जा आदी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा या राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत.अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वीच घेतला होता, असे खात्रीलायकरीत्या समजते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभाध्यक्ष बागडे यांना फोन केला आणि ‘पुढील दोनचार दिवस आपण कुठे आहात; मुंबईत आहात का’?, अशी विचारणा केली होती. स्वत: बागडे यांनीच ही माहिती दिली. याचा अर्थ राजीनामा देण्याचे त्यांच्या मनात तीनचार दिवसांपासून घोळत होते हे स्पष्ट होते.पार्थ यांचा कल भाजपकडेअजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अलिकडे भारतीय जनता पक्षात प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. भाजपच्या राज्यातील एका बड्या नेत्याशी त्या बाबत संपर्क साधण्यात आला होता आणि त्यासाठी पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी अनुकूलता दर्शविली होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाली. पार्थ यांना भाजपमध्ये घेण्याबाबतच्या प्रस्तावाला राज्याच्या नेतृत्वाने हिरवा झेंडा दाखविला नाही. त्यामुळे तो विषय मागे पडला, असेही समजते. पार्थ यांचे सख्खे मामा व माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी अलिकडे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागे कुटुंबातील वाद की पक्षांतर्गत अवहेलना?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 2:46 AM