"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 08:56 PM2024-10-01T20:56:51+5:302024-10-01T20:58:14+5:30

अमित शाह यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar's response to Amit Shah's statement, "Government cannot come on the strength of one party"! | "एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!

"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी अमित शाह यांनी मुंबईतील दादर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी येत्या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल. मात्र, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर केवळ भाजपच्या ताकदीवर स्वबळाची सत्ता येईल, असं विधान अमित शाह यांनी केले आहे. 

अमित शाह यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात पोहोचली. यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांना अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. १९८५ नंतर जवळपास ४० वर्षे एका पक्षाचं सरकार कधीचं आलं नाही. इतर राज्यांची आणि महाराष्ट्राची परिस्थितीत वेगळी आहे. भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आजच्या परिस्थितीत एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचं उत्साह वाढवण्यासाठी, त्या हेतून त्यांनी सांगितले असेल. भाजपला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

याचबरोबर, अजित पवार हे तिसऱ्या आघाडीमध्ये जातील असे काहीजणांकडून म्हटले जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मी तिसरा आघाडीचा चेहरा होईल असं सांगितलं जातं. पण हे ऐकून आमची करमणूक होते. आमचे आम्हालाच कळत नाही, आमची ब्रेकिंग न्यूज तिथे चालत असते. तिसरी आघाडी होईल, चौथी देखील होईल. त्यांचे उमेदवारी त्यांनी जाहीर केले आहेत, असे अजित पवार म्हणाले. तसेच, आज माजलगाव आणि परळीत जनसन्मान यात्रेसाठी आलो. जास्तीत मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहे. योजना सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही कुणावरही टीका करत नाही. आम्ही काम करणार आहोत हे आम्ही लोकांना सांगत आहोत, असे देखील अजित पवार म्हणाले.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात, आपण केंद्रात सलग तिसरे सरकार बनवले. आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. मी सांगतो राज्यात भाजपचं सरकार होईल. त्यासाठी जोमात काम करा. यंदा २०२४ ला महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. २०२९ मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे आहे. यंदा फक्त ऐका, २०२४ मध्ये युतीचे सरकार असेल. पण २०२९ मध्ये शुद्ध रुपाने कमळचे सरकार असेल, असे मोठे विधान अमित शाह यांनी केले आहे. 

अमित शाहांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही सूचना दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय रहावे, प्रत्येक बूथवर भाजपचे १० कार्यकर्ते असावेत अशा सूचना अमित शाहांनी दिल्या. तसेच शक्य तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना फोडावे आणि भाजपमध्ये सामील करून घ्यावं अशा सूचनाही अमित शाहांनी दिल्या.

Web Title: Ajit Pawar's response to Amit Shah's statement, "Government cannot come on the strength of one party"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.