अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार...; पवारांचा खास शैलीत वार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:59 PM2023-12-02T16:59:59+5:302023-12-02T17:05:11+5:30
अजित पवार गटाने काल केलेल्या आरोपांना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवण्यात आली. या आरोपांना आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवारांनी आता एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण माझी फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरला, तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाचा घेतला, त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आलं आणि त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. मग आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.
अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना शरद पवार म्हणाले की, "ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हा लोकांना मान्य नव्हता. विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली होती, ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. तेव्हा आम्ही जी भूमिका मांडली, त्याविरोधात जाणं ही लोकांची फसवणूक ठरली असती. आजही आमची भूमिका भाजपविरोधात आहे."
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना स्वत:च आंदोलन करायला सांगितलं, असा घणाघात काल अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यावर पवार यांनी म्हटलं की, "मला राजीनामा द्यायचा किंवा मागे घ्यायचा असेल तर कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्याची माझी कुवत आहे."
दरम्यान, मी पुस्तक लिहून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. "प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मीही वाट बघत आहे. लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं," असा टोला पवारांनी लगावला आहे.