मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत सुटलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाच्या कामालाही स्थगिती दिल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेचे अजित पवार यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वढू येथील संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातील कामांना आमच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप केला आहे. दादांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे होतं. मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिलंय की, या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामं घेतली आहेत. त्यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर करावं. त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामांना, निर्णयांना स्थगिती देण्याच्या शिंदे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला होता. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाच्या कामाला या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत काम केलंय, त्यांनीच मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावलाय. असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकारं येत असतात जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत. त्याचा विचार करायचा की नाही, असे अजित पवार म्हणाले होते.
२०२१ पर्यंतची कामं बंद करणं योग्य नाही. विकासाची कामं होती. महाराष्ट्रातील कामं होती, कुणाच्या घरादारातील कामं नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू य़ेथील नियोजित स्मारकाचा निधीही स्थगितीमुळे रखडलाय. राजर्षी शाहू महाजारांचा निधीही अडकलाय. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असं खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात झालं नव्हत. हे तातडीने थांबवा, असा इशाराही अजित पवार यांनी दिला होता.