मुंबई - राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर विश्वासमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील अजित पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी दिसून येत आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचे भाषण करताना, सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच मविआ सरकारच्या काळात घडलेल्या विविध घटनांवरून टोले लगावले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, देवेंद्रजी आज तुमच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह नव्हता. तुमचा तो जोश दिसला नाही, म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच जोरदार टोला लगावला.
देवेंद्र फडवीस यांचे भाषण आटोपल्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले अजित पवार पहिल्या वाक्यापासून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे-भाजपा सरकारवर तुटून पडले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणीस यांनी एकनाथ शिंदेंनी विश्वासमत जिंकल्याने सभागृहात अभिनंदनपर मत व्यक्त केले आहे. मी अनेक वर्षं देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात भाषण करताना बघितलंय. पण देवेंद्रजी, नेहमीचा उत्साह आज तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तुमचा तो जोश आज दिसला नाही. मी तुम्हाला मुख्यमंत्री असताना पाहिलंय आणि विरोधी पक्षनेते असतानाही तुम्हाला पाहिलंय. त्यावेळी सर्वजण शांत राहून तुमचं भाषण ऐकायचे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, देवेंद्रजी, तुम्ही वकील आहात आणि वकिलीच्या पेशाने कसं हे योग्य असल्याचा प्रसत्न केलात. तसेच एकनाथ शिंदेंची कारकीर्द दैदीप्यमान असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला.यात एक गोष्ट आवर्जुन सांगायची आहे. यावेळी विधिमंडळात जे आमदार निवडून आले आहेत. त्या सर्वात नशिबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचं कारण म्हणजे सभागृहाची अडीच वर्षच झाली आहे. अडीच वर्षं बाकी आहेत. या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले,उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. कुठलं पद भुषवायचं सोडलं नाही, असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.