मावळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केलं. यावेळी, हात जोडून सांगायचंय की, मुलं होतात देवाची कृपा, अल्लाहाची कृपा म्हणतात. पण काही देवाची वगैरे कृपा नसते. नवऱ्याची कृपा असते म्हणून पोर बाळं होतात. कृपा करून दोन मुलांवर थांबा. दोन मुलांवर थांबलात तर अधिक योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना शिकवता येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मावळमध्ये मागासवर्गीय समाज आहे. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा आधिक फायदा तुम्ही घेऊ शकता. त्या दोन मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकाल. चांगल्या पद्धतीने सांभाळ करु शकता. तसंच, तुम्ही देखील चांगलं जीवन जगू शकता. आम्ही बाकीच्या बाबतीत ८० कोटी लोकांना भारतात मोफत अन्नधान्य देतो. हे जनसन्मान योजनेच्या माध्यमातून याच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर, भाऊ ओवाळणी टाकतो ती परत घेत नसतो. त्यामुळं विरोधक जे सांगत आहेत पैसे परत घेणार आहे. तर असं काहीही होणार नाही. पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी उद्या पैसे जमा होणार आहेत. ते पैसे तुमचे आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. महिलांनी आशीर्वाद दिले. महायुतीमधील जिथे जिथे उमेदवार असतील त्यांना मतदान करा. म्हणजे ही योजना कायमची सुरु ठेवता येईल, असं अवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केलं आहे.
…म्हणून मला गुलाबी रंग आवडतोगुलाबी रंग महिलांना आवडतो म्हणून मलाही आवडायला लागला. यात चुकीचे काय आहे. आम्ही वेडे वाकडे तर करत नाही ना? महिला लग्नात देखील इतक्या सुंदर दिसत नव्हत्या. इतक्या फेट्यात दिसत आहेत. नवरे देखील ओळखायचे नाहीत. फेटा घरी जाईपर्यंत काढू नका, फेटा घातल्यावर कोण कसा दिसतो, हे नवऱ्याला विचारा असंही अजित पवार म्हणाले.