राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रचार सभा घेत आहेत. यादरम्यान, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार म्हणाले, "आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा... म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल."
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी कामे केली आणि करतो आहे. मला काम करायला आवडतात. मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे मी अधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागत त्यांना सांभाळावे लागते, असे देखील अजित पवार म्हणाले.
याचबरोबर, जो उमेदवार दिला आहे तिथल्या आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो त्याला इच्छा असते खासदारांने ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो ते ढवळाढवळ करणार नाहीत ते बाहेरचे वाटणार नाही ते तुम्हाला आपले वाटतील.मतदान करताना नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवावा लागेल, असे अजित पवार म्हणाले.
पदावर काम करण्याची संधी मिळाली तर पुढच्या 25- 50 वर्षाचा विचार करुन काम करा. माझ्या बारामतीत सुद्धा 382 कोटी एवढी मंजुरी देऊ शकलो नाही पण इंदापूरमध्ये दिला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल कामाचा आढावा घेईल. आम्ही जो उमेदवार दिला आहे, तो देखील काम करेल, असेही अजित पवार म्हणाले.
मोदींची प्रशासनावर पकड आहे. उगाच उठवायचे आणि चकाट्या पिटायच्या संविधान बदलणार. काहींनी म्हणायचं ही शेवटची निवडणूक आहे, हुकूमशाही येणार असे म्हणायचे. काहीही सांगणार, काहीही आरोप करणार. आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका, असे अजित पवार म्हणाले. तसेच अजित पवारांनी यावेळी विरोधकांवर देखील टीका केली. आधी शिवसेनेसोबत गेलो तेव्हा कोण बोलले का? असा सवाल करत आता भाजपासोबत गेले, भाजपासोबत गेले असे म्हणतात. अरे ती पण माणसे आहेत ना? महायुतीत गेलो म्हणून पुढे मागे सरकावे लागते, तसे त्यांनी पण सरकावे.' असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.