अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र अन् भावनिक साद; तुम्हाला हात जोडतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 03:10 PM2024-02-25T15:10:21+5:302024-02-25T15:10:47+5:30
पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
इंदापूर - परिस्थिती बदललेली आहे. आपणही भूमिका बदलली पाहिजे. फक्त इंदापूर तालुक्यासाठी नव्हे तर सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आवाहन आहे, बोलताना जपून बोला, कुठल्याही मित्रपक्षाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, ही माझी हात जोडून विनंती आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
इंदापूर येथील मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, सत्ता नाही म्हणून कार्यकर्त्यांना काम होत नाही अशी कारणे देऊ शकत नाही. कार्यकर्त्यांचा विचार पाहून निर्णय घ्यावा लागतो. मी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणे आणि ज्याच्यात धमक त्याला संधी देणे हे माझे धोरण आहे. निवडणूक हे युद्ध असते, हे युद्ध कार्यकर्त्यांच्या बळावर लढलं जाते. कार्यकर्त्यांनी उचलून धरले की समाजात मान सन्मान मिळत असतो. पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा होतो, मेहनतीवर आणि त्यांच्या घामावर मोठा होतो. त्यामुळे आम्हाला याची जाणीव आहे असंही अजित पवारांनी सांगितले.
तसेच लोकसभा, विधानसभा आपण एकत्रित लढवणार आहोत. आपल्याला सर्वांची मदत घ्यावी लागणार आहे. वेगळा उद्देश घेऊन पुढे वाटचाल करतोय. पक्षात आणि सहकारी मित्रपक्षात मतभेद होतील यासाठी अनेकजण देव पाण्यात घालून बसलेत. त्यामुळे असे काही होणार नाही याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. घटकपक्षासोबत सुसंवाद ठेवा, चहापाण्याला बोलवा. सहकारी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्ष कार्यालयात यायला हवेत. आपलेही कार्यकर्ते तिथे जायला हरकत नाही. एकमेकांचा मान सन्मान ठेवा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.
दरम्यान, लोकसभेच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणायच्या आहेत. ४०० पार आकडा घेऊन जाताना इंदापूर तालुक्यातही मोठे काम झाले पाहिजे. मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावायची आहेत. कुणी फोन करतील, कुणाला आठवणी येतील, पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील. त्यात कितपत लक्ष द्यायचे हे तुम्ही ठरवा. विरोधी पक्षाकडून डिवचवण्याचा आणि फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतील. २ महिने कार्यकर्त्यांनी दक्ष राहा. कुठेही फूट पाडू नका. पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे.