अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले, ‘कुठं दगड ठेवला कुठं धोंडा ठेवला हे मी…’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:45 PM2022-07-25T20:45:16+5:302022-07-25T20:45:51+5:30
Ajit Pawar: भाजपाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवत आपण शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता, असं विधान केल्याने विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत मिळालं आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई - शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंडाळी होऊन एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी वेगळा गट केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला होता. दरम्यान, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा घेतलेला निर्णय भाजपाच्या राज्यातील कार्यकर्त्यांना फारसा रुचला नसल्याचे दिसत होते. त्यातच नुकत्याच पनवेलमध्ये झालेल्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवत आपण शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता, असं विधान केल्याने विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत मिळालं आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यावर अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी कशावर दगड ठेवलाय, हे त्यांचं त्यांनाच माहिती. मात्र त्या मुद्द्यावर बोलत नाही. त्यांच्या आईचं निधन झालंय, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. थोडे दिवस जाऊ द्या, कुठं दगड ठेवलाय, कुठं धोंडा ठेवला हे मी सभागृहात सांगेन.
दरम्यान, राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला. तुमच्याकडे बहुमत आहे ना मग मंत्रिमंडळाचा विस्तार ताबडतोब करा असं ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या दोघांच्या हाती काही आहे, असं वाटत नाही. दिल्लीत जाऊन तिकडून हिरवा झेंडा मिळत नाही तोपर्यंत शिंदे आणि फडणवीस काही करू शकत नाहीत असं चित्र दिसतंय, असा टोला अजित पवार यांनी लगावला.