महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:43 PM2023-09-01T17:43:43+5:302023-09-01T17:44:53+5:30

देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असं अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar's Thackeray group strongly targeted Pawar group in Mahayuti meeting | महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

महायुतीच्या सभेत अजित पवार कडाडले; संजय राऊत-जितेंद्र आव्हाडांना जोरदार फटकारले

googlenewsNext

मुंबई – नुकतेच निती आयोगाचे मुंबईत बैठक घेऊन पुढील विकास आराखडा बनवणार असल्याचे सांगितले. त्यावरून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला. या आरोपाचा महायुतीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. जोपर्यंत चंद्र, सूर्य तारे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कुणाचा बापही करू शकत नाही अशा शब्दात अजित पवारांनी आव्हाड-राऊत यांना फटकारले आहे.

अजित पवार म्हणाले की, अलीकडेच निती आयोगासोबत बैठक झाली, काहीजण विकासाच्या बाबतीत बोलत नाही. राज्याचे हित कशात ते सांगत नाही. परंतु जातीजातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करायचे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे असं पंतप्रधान सांगतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. निती आयोगाने देशात ४ शहरे निवडली आहे. टप्प्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला जातो. मी जे बोलतो ते खरे बोलतो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणं कुणाच्या बापाला शक्य नाही. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची. अनेकदा याप्रकारचे आरोप केले गेले. निव्वळ जनतेची दिशाभूल केली जाते. तुम्ही विकासावर बोला, राज्याचे जनतेचे हित कशात त्यावर बोला. काही चुकत असेल तर ते दाखवा. काम करताना एखादी गोष्ट चुकली तर ताबोडतोब दुरुस्त करण्याची तयारी आहे. वाराणसी उत्तर प्रदेशातून, सुरत गुजरातमधून बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे नाव घेतले तर तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतो, त्याच्या वाटचालीचा आज सर्वात दिशादर्शक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात भारताची विकासाकडे घौडदौड सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य घटकांपर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करतंय असंही अजित पवार म्हणाले.

मोदींचे हात बळकट करू

महाराष्ट्रातील थांबलेली कामे अधिक वेगाने व्हावीत. राज्यभरात सर्व्हे करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेही काही कमी पडू देणार नाही. नैसर्गिक संकटे येतात, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, दरड कोसळते यासारख्या अनेक प्रसंगांना आम्ही सामोरे गेलोय, संकटे आली म्हणून डगमगायचं नसते. अधिक मजबुतीने पुढे जायचे असते. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असं अजित पवारांनी सांगितले.

महायुतीत कुठलाही वाद नाही

मागच्या गोष्टी उकरण्यापेक्षा आपल्या सर्वांची शक्ती आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा यातून चांदा ते बांदा सर्व ४८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा सभा झाल्या पाहिजेत. राज्य पातळीवर काम करणारे लोक एकत्र येतात, चर्चा करतात, पण जाणीवपूर्वक आमच्यात वाद असल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. परंतु महायुतीचे यश, राज्याचे हित कशात आहे, कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी एकमेकांशी संवाद ठेवत असतो. महायुतीत समज-गैरसमज राहता कामा नये. मुंबईत हा मेळावा घेतलाय तसा प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात जाऊन जनतेला संबोधित करायचे आहे असं अजितदादांनी म्हटलं.

वन नेशन, वन इलेक्शनला पाठिंबा

१९६७ पर्यंत देशात एक निवडणूक व्हायची, राज्यात १९९९ पर्यंत एकत्रित निवडणूक झाल्या, त्यामुळे खर्च कमी होतो. प्रशासकीय दडपण कमी होते, सारख्या निवडणुका लागल्याने विकासकामे रखडतात. प्रचंड वेळ खर्च होते, देशात कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. त्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांना वेळ द्यावा लागतो. परंतु विकासकामांना गती देता येत नाही. आचारसंहितेमुळे विकासकामे खोळंबतात, त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. निवडणुकीमुळे वारेमाप खर्च होतो त्याचाही विचार केला पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन ही गरजेची गोष्ट आहे. सर्व लक्ष विकासकामांवर देता येईल. केंद्र सरकारची भूमिका जनतेलाही मान्य असेल असं सांगत अजितदादांनी वन नेशन वन इलेक्शन या भूमिकेला पाठिंबा दिला.

अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून मिळते, युती आणि आघाडी करताना पक्षाच्या विचाराशी प्रतारणा होणार नाही. समाजातील वंचित घटकांना हक्क मिळेल, कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. भविष्यातही आमचा हाच प्रयत्न राहणार आहे. महायुतीतही महामानवांबद्दल आदराची भावना आहे. सर्वांच्या विचारानेच राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांनी योगदान दिले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सर्व पक्षांचे, सर्व विचारांचे लोक सहभागी झाले, त्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचे काम यशवंतराव चव्हाणांनी केले. राजकारणातील अस्पृशता संपवली पाहिजे. विकासासाठी एकत्र आले पाहिजे. केंद्राकडून अधिक निधी मिळून राज्याला पुढे नेण्यासाठी महायुतीचा भर राहणार आहे. पक्षाच्या हितासाठी, महायुतीसाठी इथून पुढच्या काळात आक्रमक राहिले पाहिजे. अनावश्यक एकमेकांविरोधातील संघर्ष टाळला पाहिजे. महायुतीच्या नेत्यांबद्दल टिप्पण्या करू नये. काम करताना काही समज गैरसमज झाले तर पक्षाच्या वरिष्ठांशी बोलले पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. कार्यकर्त्यांच्या पाठिशी मजबुत उभे राहण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केला जाईल असा कानमंत्र अजितदादांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.

Web Title: Ajit Pawar's Thackeray group strongly targeted Pawar group in Mahayuti meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.