सुकृत करंदीकर- पुणे : सन २००४, सन २००९, सन २०१९...यातल्या प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर नाराज होण्याची वेळ ओढवली. ही वेळ दुसऱ्या कोणामुळे नव्हे तर ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच आली.यंदाच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. काही महिन्यांपुर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून स्वत:च्या मुलाला पार्थला पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी अजित पवारांना मिनतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या. गेली पंधरा वर्षे अनेक निवडणुकांची शेकडो तिकीटे वाटणाऱ्या अजित पवारांना ही गोष्ट फार लागली होती. ‘काका’ आपल्याला डावलतात, अशी भावना अजित पवारांच्या मनात येण्याची ही पहिली वेळ नाही.सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ७१ तर कॉंग्रेसने ६९ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचारयंत्रणा राबवण्यापर्यंत अजित पवारांनी मोठा पुढाकार घेतला होता. स्वाभाविकपणे पक्षात अजित पवारांना मानणाऱ्या आमदारांची संख्या जास्त होती. काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्याने आपल्या रुपाने ‘राष्ट्रवादी’ने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगावा, हा अजित पवार यांचा आग्रह होता. मात्र शरद पवारांनी तसे घडू दिले नाही. राज्यात आणि केंद्रात जास्तीची मंत्रीपदे घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय त्यांनी केला. काँग्रेस पूर्णत: ‘बॅकफुट’वर असतानाही हाती येणारे मुख्यमंत्रीपद निसटल्याने अजित पवार पहिल्यांदा काकांवर नाराज झाले होते. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यावेळी अजित पवारांना काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात रस नव्हता. भाजपा-शिवसेना या पक्षातील आमदार फोडून राष्ट्रवादीचे सरकार आणण्याचा महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी आखली होती. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या ते संपर्कात होते. सिमल्याला मुंडे-अजितदादांची भेट झाल्याची खमंग चर्चा त्यावेळी रंगली होती. ‘अजित पवारांचा पुलोद प्रयोग’ या शब्दात याची चर्चा वरीष्ठ राजकीय गोटात झाली. अर्थात त्यालाही ‘काकांनी’ मंजुरी दिली नाही. पुन्हा एकदा अजित पवारांना त्यांची तलवार म्यान करावी लागली. एवढेच नव्हे तर त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही त्यांना सहजी दिले गेले नाही. त्याहीवेळी पवार नाराज होऊन पंधरा दिवस अचानकपणे अज्ञातवासात गेले. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, यासाठी त्यांच्या समर्थक आमदारांना शरद पवारांना विनवण्या कराव्या लागल्या होत्या. प्रचंड ‘लॉबींग’ केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद त्यांना बहाल केले गेले. या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा निवडणुकीची मुलाला मिळवलेली उमेदवारी, त्यात त्याचा झालेला पराभव, रोहित राजेंद्र पवार यांचे वाढते महत्त्व या अलिकडच्या घटनांमुळे अजित पवारांची नाराजी वाढत गेल्याचे सूत्र सांगतात. ‘राष्ट्रवादी’च्या प्रत्येक कार्यक्रमात शिवप्रतिमा असलेला भगवा झेंडा फडकवावा, ही अजित पवारांची सूचना देखील काकांनी व्यक्तीगत असल्याचे सांगत स्पष्टपणे झटकून लावली होती. काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान दिले जात नसल्याची सल अजित पवारांना होती. या साचत गेलेल्या नाराजीचा स्फोट आमदारकीच्या राजीनाम्यातून झाली असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
...........पुतण्याच्या ‘टायमिंग’मुळे ‘काकां’ना ठेचईडी चौकशीच्या निमित्ताने शरद पवारांनी प्रचारात आघाडी घेतली होती. ईडीच्या भेटीला जाण्याची तारीखही त्यांनी जाहीर केली. नेमक्या त्याच दिवशी राजीनामा देण्याचा मुहूर्त अजित पवारांनी शोधल्याने शरद पवारांच्या गतीला ठेच लागली आहे. शरद पवारांवरचा केंद्रबिंदू बाजूला हटून उभ्या महाराष्ट्रात आता पवार काका-पुतण्या यांच्यातील वादाची चर्चा सुरु झाली आहे.
................सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांवर न्यायालयीन प्रक्रियेची टांगती तलवार गेल्या काही वर्षांपासून आहे. ईडीच्या चौकशीवरुन शरद पवारांनी स्वत:चा बळी जात असल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी गेल्या काही दिवसात आकाशपाताळ एक केले आहे. मात्र त्याचवेळी इतर संचालकांच्या ईडी चौकशी बाबत त्यांनी चकारही काढलेला नाही. त्यामुळे ‘काकां’कडून पाठराखण केली जात नसल्याची खंत अजित पवारांना असल्याचे सांगितले जात आहे.