ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिलेली नाही, असा खुलासा लाचलुचपत विभागाने (एसीबी) अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) केला आहे. त्यामुळे याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीने एसीबीकडून कागदपत्र मागवली होती. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांना क्लीन चिट दिलेली नाही, असे एसीबीने स्पष्ट केले. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एसीबीने अजित पवार यांची चौकशी केली होती. याचबरोबर, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती.
दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना एसीबीकडून अटकही करण्यात आली होती. या सर्व घोटाळ्यात अजित पवारांची नेमकी भूमिका काय आहे, हे तपासण्यासाठी एसीबीकडून ईडीने कागदपत्राची मागणी केली होती. एसीबीने पुर्तता केलेल्या कागदपत्रात अजित पवार यांना क्लिन चिट देता येत नाही असा खुलासा केल्याने ईडीकडून आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागामध्ये 72 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. अजित पवार यांनी सर्व मोठ्या आणि लघु प्रकल्पांसह त्यांच्या वाढीव खर्चाला घाईघाईने मंजुरी दिली होती. दरम्यान, याप्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी एसीबीने चौकशीसाठी ऑक्टोबर 2015 मध्ये तीन वेळा समन्स बजावला होता. यानंतर त्यांची एसीबीच्या मुख्यालयात सहा तास चौकशी झाली होती.