अजित पवारांची आदल्या दिवशी भेट, फडणवीसांची बारामतीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक; नाराजी दूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:26 PM2024-03-20T12:26:06+5:302024-03-20T12:26:52+5:30
महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे तसे वातावरणही तयार झाले पाहिजे. अजित पवारांशीही चर्चा झाली पाहिजे - हर्षवर्धन पाटील.
बारामती मतदारसंघातून मुलीला लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यासाठी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तयारी केली होती. एकीकडे शरद पवार, दुसरकडे विजय शिवतारे आणि तिसऱ्या बाजुने हर्षवर्धन पाटील हे विरोधात असल्याने अजित पवारांनी मंगळवारी थेट फडणवीसांची भेट घेत पाटलांसोबतचा तिढा सोडविण्याची विनंती केली होती. यावरून आज फडणवीसांनी पाटलांना चर्चेसाठी बोलावले होते.
हर्षवर्धन पाटलांनी या बैठकीनंतर अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचे आहे. माझी महायुतीवर नाराजी नव्हती. महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे तसे वातावरणही तयार झाले पाहिजे. यामुळे कार्यकर्ते देखील काम करतील. अजित पवारांशीही चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका मी फडणवीस आणि अमित शाह यांच्याकडे मांडल्याचे पाटील म्हणाले.
स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले पाहिजे. कार्यकर्त्यांची भुमिका मांडली आहे. आम्हाला फडणवीस, शाह यांनी हा प्रश्न विचारात घेऊ असे आश्वासन दिले आहे, असेही पाटील म्हणाले.
जाहीरपणे भाषणात, पाच-सहा सभांमध्ये आमचे सहकारी आम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाही. अर्वाच्च भाषेत बोलत होते. महायुती पाळायची असेल तर या गोष्टीही पाळल्या पाहिजेत. शिवतारेंसदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही. त्यांच्याशी माझाही संपर्क झालेला नाही. आजची पहिली बैठक झाली, दुसरी बैठक लवकरच होईल, असेही पाटील यांनी म्हटले.