मुंबई - सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपल्यावर असलेले गुन्हे आणि विविधी चौकशा थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यामुळे गयारामांची धाकधूक वाढणार आहे.
भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. परंतु, ज्यावेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल, त्यावेळी हे नेते सैरभैर होणार, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला आहे. मात्र विधानसभेला केवळ २८८ जागाच लढवता येणार आहे. शिवसेना-भाजप युती होणार हे भाजपकडून सांगितले जात आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. त्यात अपक्षांचा पाठिंबा त्यांनाच आहे. अशा स्थितीत गयारामांना सामावून घेताना भाजपला कसरत करावी लागणार आहे. या स्थितीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गयाराम सैरभैर होणार, असा दावा पवारांनी केला.
दरम्यान भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गयारामांची स्थिती अवघड होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल, असंही त्यांनी सांगितले. पुण्यातील मर्चंट बँकेच्या शाखेचे नवीन कार्यालयात स्थलांतर झाले. या कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.