पिंपरी : नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना महापालिकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकाने सभागृह नेत्यांच्या कार्यालयात विकासकामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांकडून विकासकामे व रखडलेल्या कामांची माहिती घेतली. या बैठकीची आज महापालिका वर्तुळात चर्चा होती. बैठकीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र इन्कार केला.२० आॅक्टोबरला पुणे विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आचारसंहितेपूर्वी कोट्यवधींचे विषय मंजूर करण्याचे ठरविले होते. मात्र, त्याअगोदरच नगरपालिकांची आचारसंहिता महापालिका क्षेत्रासाठीही जारी झाली. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला. आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा गुंडाळाव्या लागल्याने सत्ताधाऱ्याचे डाव धुळीस मिळाले आहेत. यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महापालिकेत स्वीय सहायकाला धाडल्याची चर्चा आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हेही उपस्थित होते. या दोघांनी विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी उपअभियंत्यांपासून ते प्रत्येक विभागप्रमुखांपर्यंत सर्वांना बोलावून घेत कामांची सद्य:स्थिती आणि उर्वरित कामांची माहिती जाणून घेतली.(प्रतिनिधी)>माजी उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक महापालिकेत येऊन त्यांनी बैठक घेतली, याबाबतच्या वृत्तात तथ्य नाही. आम्ही काही पदाधिकारी महापालिकेत होतो. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. नगरपालिका क्षेत्रासाठी असणारी आचारसंहिता महापालिका क्षेत्रात शिथिल करावी, आचारसंहितेमुळे कामे रखडणार आहेत. याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवारांच्या पीएकडून कामांचा आढावा
By admin | Published: October 19, 2016 1:41 AM