ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सरु आहे. गेल्या रविवारी पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. मात्र, अजित पवारांनी काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात, असे म्हणत राज ठाकरेंनाच टोला लगावला.
(...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे)
दरम्यान, ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची आज राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी जे बोललो ते 1960 पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केले होते. अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
(काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)
याचबरोबर, अभिनेता आमिर खानसारख्या 1 लाख 20 हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाहीत, आमीर खाननं लोकसहभागातून 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आमिर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगली कामे केली आहेत, हे मला अशोक चव्हाण बोलले. जर लोकसहभागातून कामं होणार असतील तर मग सरकार काय करतंय. सरकारी अधिकारी आमिर खानसाठी काम करतायेत का ?, मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमिर खानच्या आड लपवू नये, अशी टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली.
(राज ठाकरे, तुम्ही बरोब्बर बोललात पण...)
(पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)