अजितदादा,एकतर आम्हाला बोलवा किंवा मग तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या! फडणवीसांची 'ऑफर'
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 1, 2021 07:00 PM2021-01-01T19:00:48+5:302021-01-01T19:05:57+5:30
पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्सुकता नव्हती तितकी मीडियामध्ये होती..
पुणे : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार असतील तर हल्ली त्या कार्यक्रमाच्या आधी २ दिवस व नंतरचे दोन दिवस माध्यमांमध्ये बातम्यांची चढाओढ सुरु असते. पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्सुकता नव्हती तितकी मीडियामध्ये होती. त्यामुळे गेले दोन दिवस अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार या विषयीच्या बातम्याच बातम्या पाहायला मिळाल्या. पण जरी मी आणि दादा एकत्र येणार होतो तरी आम्ही काय कुस्ती वगैरे खेळणार होतो की एखादे गाणे म्हणणार होतो , मला काही कळत नाही. त्यामुळेच आता अजितदादा, एकतर तुम्ही तरी आमच्याकडे चहाला या किंवा मला तरी तुमच्याकडे बोलवा म्हणजे मीडियाला बातम्याच बातम्या मिळून जातील, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात चहाची 'खास' ऑफर दिली.
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी फडणवीसांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , खासदार डॉ. अमोल कोल्हे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. मेट्रो, पिण्याचे पाणी, वाहतूक, उदयॊग धंदे, आरोग्य यांचा समावेश आहे. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे. तसेच भामा आसखेड प्रकल्पाची पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनोखी भेट मिळाली आहे. मात्र या प्रकल्पासाठी खासदार गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतला व पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे. परंतू, यापुढे पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे.
पुण्यात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले...
पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकत्यांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण होते. या आगामी काळातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात हे दोन दिग्गज नेते एकत्र येत असल्याने राजकीय फटकेबाजी अनुभवायला मिळण्याची शक्यता होती. पण या कार्यक्रमादरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडल्याने कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाला.