"अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा", संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:39 IST2024-12-28T18:36:42+5:302024-12-28T18:39:32+5:30

संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातून महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केले, तर छत्रपती घराणे बीडचं पालकत्व घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली. 

"Ajitdada, if you have courage, then take action against Dhananjay munde", Sambhajiraje made a big announcement in Beed | "अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा", संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

"अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा", संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

वाल्मिक कराडचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतोय. बीडमध्ये आता दहशत खपवून घेणार नाही. धनंजय मुंडेंला पालकमंत्री केलं, तर छत्रपती घराणे बीडचे पालकत्व घेईल, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली. सरकारला तीन आरोपी अजून सापडत नसतील, तर रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिकाही संभाजीराजेंनी यावेळी मांडली. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (२८ डिसेंबर) आक्रोश मोर्चा बीड शहरात काढण्यात आला. या मोर्चात बोलताना संभाजीराजे छत्रपतींनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. 

'मुंडेंना पालकमंत्री केलं, तर बीडचं पालकत्व घेणार', संभाजीराजेंची घोषणा

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "हा जो म्होरक्या आहे, त्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतोय. धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. मला माहिती नाही की, त्यांचा राजीनामा घेतील, हकालपट्टी करतील का? पण, बीडच्या जनतेला मला हेच सांगायचं आहे की, जर का त्याला (धनंजय मुंडे) पालकमंत्रिपद दिलं, तर हे छत्रपती घराणे बीडचे पालकत्व घेणार", अशी घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली. 

"आम्हाला दहशत चालणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि इथे जर कोणी दहशत पसरवत असेल, तर माझी जबाबदारी आहे, मी इथे येणार. काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचा आहे का? नाही ना, मग आता आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही", असे आवाहन संभाजीराजेंनी उपस्थितांना केले.

"हा बिहार नाही, हा आपला महाराष्ट्र आहे. बीडवर आमचं प्रेम आहे. १९ दिवस झाले, ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून. त्यांचा हा म्होरक्या. मला सरकारला विचारायचं की, तुम्ही कसं चालवून घेता? मुख्यमंत्री विधानसभेत सांगतात की, एसआयटी लावली आहे. हा म्होरक्या खंडणीत दोषी आहे. हे मुख्यमंत्री बोलले. त्याला अजून अटक का झाली नाहीये?", असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

संभाजीराजे म्हणाले, 'त्याला माहिती नाही का, तो कुठे आहे?'

"धनंजय मुंडे सांगतात की, माझे आणि त्यांचे (वाल्मिक कराड) जिव्हाळ्याचे संबंध आहे. माझे आणि त्यांचे घरचे संबंध आहेत. आमचे त्यांचे व्यावहारिक संबंध आहेत. या म्होरक्याला व्यवहाराचे अधिकार दिले आहेत. आताचा मंत्री (धनंजय मुंडे) का जबाबदारी घेत नाहीये, वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहिती नाही का कुठे आहे? त्याला कुठे ठेवले आहे, याची सगळ्यांना कल्पना आहे. आम्ही आता ही दहशत कदापि खपवून घेणार नाही", असे असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला. 

अजित पवारांकडे मागणी

"मला अजित पवारांना सांगायचं की, तुम्ही आयुष्यभर बोलून दाखवता परखडपणाने की, माझी काम करायची पद्धत आहे. तुमची काम करण्याची पद्धत तशी असेल, तर आता तुम्ही कार्यक्रम करेक्ट करा. तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यात हिमंत असेल, तर या मंत्र्याला पहिलं हाकला मंत्रिमंडळातून", अशी मागणी संभाजीराजेंनी केली. 

Web Title: "Ajitdada, if you have courage, then take action against Dhananjay munde", Sambhajiraje made a big announcement in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.