ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १० : 'नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे' सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत. हे शब्द कानावर पडताच प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी सरसावणार्यांची आता निराशा होणार आहे. कारण केंद्र सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा आदेश दिला आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आदेशानुसार पुण्याच्या प्रादेशिक वृत्त विभागातील उपसंचालक आणि वृत्त संपादक ही दोन्ही पदे अनुक्रमे श्रीनगर व कोलकात्याला हलवण्यात येणार आहेत. तसेच वृत्त विभागात नवीन पदे भरली जात नसल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचणारा हा आवाज आता लवकरच बंद होणार आहे. टीव्ही चॅनेल, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या सध्याच्या फास्ट जगात दिवसभर बातम्यांचा भडिमार सुरू असतो. तरीही महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिक सकाळी ७.१०च्या बातम्या आवर्जून ऐकत होते. नागरिकांना जगातील घडामोडींची माहिती देणारे १० मिनिटांचे बातमीपत्र अनेकांच्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले होते.