मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा नोंदविलेले पुण्यातील अखिल भारतीय समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला.गेल्याच आठवड्यात पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्या निर्णयाला एकबोटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. भूषण गवई व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल करण्यात आला. ३१ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. एकबोटे व सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी ही हिंसा घडविल्याची तक्रार पुण्याच्या एका महिलेने पोलिसांत केली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध अॅट्रोसिटी व इतर काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.हिंसा घडली त्या वेळी आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे घटनास्थळी आपण उपस्थित नव्हतो, असा बचाव एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात केला. मात्र, एकबोटे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांचाअटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला.
अटकपूर्व जामिनासाठी एकबोटेंची हायकोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:32 AM