पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या अनागोंदी आणि मनमानी आर्थिक कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी परिषदेचे सहकार्यवाह यांनी धर्मादाय आयुक्तांकडे करून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर दिला आहे. या तक्रारीनुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी समिती सदस्यांना नोटीस पाठविण्यात आली असून, येत्या १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी आणि काही पदाधिकारी हे संस्थेच्या कोणत्याही विश्वस्त व नियामक मंडळाच्या सदस्यांना विश्वासात न घेता तसेच घटनेप्रमाणे कोणतीही सभा न घेता व कोणतीही पूर्वसूचना आणि संमती न घेता संस्थेचे निर्णय परस्पर घेत आहेत. या सर्व गोष्टी संस्थेच्या हिताच्या बाधक आणि हानीकारक आहेत म्हणून परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी २५ सप्टेंबर रोजी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. नाट्य परिषदेच्या नवीन घटनेनुसार विश्वस्त मंडळ ९ जणांचे आहे. या मंडळाचे निमंत्रक प्रमुख कार्यवाह आहेत. परंतु निमंत्रक आणि अध्यक्षांनी एप्रिल २०१८ पासून विश्वस्त मंडळाच्या ४ रिक्त जागा जाणीवपूर्वक भरल्या नाहीत. तसेच नाट्यकर्मींना मदत करण्यासाठी अध्यक्षांनी जाहीर केलेल्या १ कोटी २० लाख रुपयांचा निधी वाटप करताना विश्वस्त मंडळ, नियामक मंडळ, कार्यकारी समिती सभेची मंजुरी घेणे आवश्यक होते. पण सभेची कोणतीही मंजुरी न घेता रक्कमांचे वाटप केले. यासाठीचे निकष, गरजू व्यक्तींची नावे व देण्यात येणाऱ्या रकमा संबंधित पदाधिकाऱयांनी स्वतःच ठरविल्या. कोरोना परिस्थितीत ऑनलाइन सभा किंवा घटनेप्रमाणे तातडीची/ परिपत्रक सभा घेण्याची तरतूद असतानाही सभा घेतली गेली नाही. अशा पध्द्तीने शंभर वर्षांची परंपरा असलेल्या नाट्य परिषदेचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू आहे. या कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. .......दोन वर्षे परिषदेचे कामकाज एकाधिकारशाहीने चालले आहे. याबाबत सभेकडे वारंवार तक्रार ही केली आहे.लगेच न्यायालयात जाणे मला संयुक्तिक वाटले नाही. पण लॉकडाऊन काळात कुणालाही विश्वासात न घेता निधीचे वाटप करण्यात आले. परिषदेच्या राखीव निधीवर बँकेत कर्जही काढण्यात आले आहे. पण आम्हाला याचा पत्ता नाही. या सर्व मनमानी कारभाराविरोधात संस्थेच्या हितासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करावी लागली- सतीश लोटके, सहकार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहांनी दिला पदाधिकाऱ्यांनाच घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 5:01 PM
काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानी काराभाराविरोधात केली धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
ठळक मुद्देमनमानी कारभाराविरोधात संस्थेच्या हितासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार