मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या २०१८-२०२३ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झालेली यादी सोमवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रसिद्ध केली. यात नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद झाला आहे. त्यांच्या अर्जातील सूचकाचे नाव अंतिम मतदार यादीत नसल्याच्या कारणावरून त्यांची उमेदवारी बाद ठरविण्यात आली आहे.मुंबई (जिल्हा) विभागातून मोहन जोशी यांच्यासह तुषार दळवी, अशोक शिंदे व सुनील तावडे यांचेही अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद झाले आहेत. या विभागातून एकूण ३६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी वरील चार जण निवडणुकीसाठी अपात्र ठरले आहेत. मुंबई (उपनगर) विभागातून १७ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. नाट्य परिषदेच्या निवडणुकीचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी मुंबईसह १९ जिल्ह्यांतील पात्र-अपात्र उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी, २५ जानेवारी रोजी सकाळी ११पासून संध्याकाळी ७.३०पर्यंत मुदत आहे. शनिवार, २७ जानेवारी रोजी संध्याकाळी ६.३० वाजता उमेदवारांची अंतिम यादी मध्यवर्ती आणि विभागीय कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद : मोहन जोशी यांचा अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:24 AM