Samajwadi Party Maha Vikas Aghadi Seat Sharing: समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आता थेट इशारा दिला आहे. समाजवादी पार्टीला पाच जागा हव्या आहेत. अखिलेश यादव यांनी त्या जागांवरील उमेदवारही घोषित केले आहेत. महाविकास आघाडी समाजवादी पार्टीला पाच जागा देण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत आहे. त्यावर अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीची भूमिका स्पष्ट केली.
'राजकारणात त्यागाला जागा नाही'; अखिलेश यादव स्पष्टच बोलले
समाजवादी पार्टीला महाविकास आघाडीकडून दुर्लक्षित केलं जात आहे, असे तुम्हाला वाटतं नाही का? असा प्रश्न अखिलेश यादव यांना दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधीकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीत त्याग करणार नाही, असा मेसेज महाविकास आघाडीला दिला.
अखिलेश यादव म्हणाले, "हे मला विचारू नका. आम्ही दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या लोकांपैकी असू शकतो. पण, जे (महाविकास आघाडी) दुर्लक्ष करत आहेत, त्यांना विचारायला पाहिजे."
"आघाडीत राहण्याचा प्रयत्न, पण..."
महाराष्ट्रात समाजवादी पार्टी किती जागा लढवणार आहे? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, "बघा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे ठरवतील. जिथे संघटन असेल... पहिला प्रयत्न असा करू की आघाडीत राहू. जर ते (महाविकास आघाडी) आघाडीत घेऊ इच्छित नाही, तर तिथेच लढू, जिथे आमच्या पक्षाला मते मिळतील. किंवा संघटन आहे, पूर्वीपासून काम करत आहे. तिथेच लढू जिथे आघाडीचे नुकसान होणार नाही."
याच प्रश्नावर बोलता अखिलेश यादवांनी महाविकास आघाडीला जागांचा त्याग करणार नसल्याचा इशाराही अप्रत्यक्षपणे दिला. ते म्हणाले, "राजकारणात हे समजून घेतलं पाहिजे की, त्यागाला अजिबात जागा नाही. राजकारणात त्याग करण्याला स्थान नाही", असे सांगत त्यांनी जागा दिल्या नाही, तर निवडणूक लढवणारच असे स्पष्ट केले.
ज्या जागा समाजवादी पार्टीला हव्या, त्यापैकी तीन मतदारसंघात मविआने जाहीर केले उमेदवार
समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे पाच जागा मागितल्या आहेत. त्या मतदारसंघातील उमेदवार अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहेत. पण, आता महाविकास आघाडीने यापैकी तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
धुळे शहर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, मानखुर्द आणि मालेगाव मध्य हे विधानसभा मतदारसंघ समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे मागितले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेने धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल गोटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर काँग्रेसने माळेगाव मध्य मतदारसंघातून एजाज बेग यांना, भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम चोरघे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अबू आझमी विद्यमान आमदार आहेत, पण या मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरही मोठं आव्हान असणार आहे.