अभिमन्यू खोपडे, गडचिरोलीराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अख्खे कुटुंब गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना सिरोंचा तालुक्याच्या विठ्ठलरावपेठा-जाफ्राबाद मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या धाकट्या कन्या तनुश्री आत्राम यांना मुलचेरा तालुक्याच्या शांतीग्राम-कोठारी जि. प. क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धर्मरावबाबा आत्राम यांचे सुपूत्र हर्षवर्धनराव आत्राम यांना अहेरी तालुक्याच्या महागाव पंचायत समिती क्षेत्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धर्मरावबाबा आत्राम यांचे धाकटे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांची कन्या नेहा आत्राम यांना अहेरी तालुक्याच्या महागाव-देवलमरी मतदार संघातून उमेदवारी राकाँकडून जि.प. करिता देण्यात आली आहे. तर अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली-उमानूर जि.प. क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच रामेश्वरराव जगन्नाथराव आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार राजे सत्यवानराव आत्राम यांचा तो पुतन्या आहे. आत्राम कुटुंबातील तीन मुली, एक मुलगा व एक पुतन्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. धर्मरावबाबा आत्राम व त्यांची सून वगळता त्यांचे संपूर्ण कुटुंबच रिंगणात उभे आहे.चार जोडपीही मैदानातयाशिवाय या वर्षी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात चार जोडपी निवडणुकीसाठी मैदानात उतरली आहेत. यामध्ये जि.प.चे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार व त्यांच्या पत्नी अंजली ओल्लालवार, विद्यमान समाज कल्याण सभापती विश्वास भोवते व त्यांच्या पत्नी विनया भोवते, विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार व त्यांच्या पत्नी सोनाली कंकडालवार, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दूधबळे व त्यांच्या पत्नी माजी जि.प. अध्यक्ष संध्या दूधबळे हे दाम्पत्यही वेगवेगळ्या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी लढत आहे.काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा पुतण्या प्रेमानंद बापुजी कोवासे हे चामोर्शी तालुक्याच्या हळदवाही-रेगडी जि.प. गणातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम या महागाव-इंदाराम जिल्हा परिषद क्षेत्रातून आदिवासी विद्यार्थी संघाकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत.