अकोला: अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या विकसित वाणांचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळविण्यासाठी पीक वाण संरक्षण शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे ७१ वाणांची नोंदणी केली. यातील ३२ वाणांना पेटंट मिळाले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वाणांची नोंदणी आणि पेटंट मिळवणारे हे देशातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. दुसरा क्रमाक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. यामुळे शेतकर्यांना या वाणांचे बियाणे रास्त दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातून १0५ वाण पेटंट नोंदणीसाठी संबंधित प्राधिकरणाकडे आले होते. त्यापैकी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वाधिक ७१ वाणांचा समावेश होता. देशातील कृषी विद्यापीठांपेक्षाही पेटंट नोंदणीसाठीचे हे सर्वाधिक वाण आहेत. या कृषी विद्यापीठाने विविध पिकांवर संशोधन करू न नवे वाण विकसित केले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन,भुईमूग, करडी, सूर्यफूल, जवस, मोहरी, मूग, उडीद, ज्वारी, भात आणि गहू अनेक वाणांचा समावेश असून, या पिकांमधील ७१ वाण पेटंट नोंदणीकरिता सादर केले. त्यापैकी ३२ वाणांना पेटंट मिळाल्याने ३0 जून रोजी या कृषी विद्यापीठाला नोंदणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. लवकरच इतर पीक वाणांची नोंदणी करण्यात येणार आहे.
अकोला कृषी विद्यापीठाच्या ३२ वाणांना पेटंट !
By admin | Published: July 02, 2016 2:27 AM