राजेश शेगोकार । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: संपूर्ण देशामध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, देशातील काही प्रमुख मार्गाबाबत हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ( एचएसआरसी ) उपयुक्तता अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये मुंबई - नागपूर मार्गाचाही समावेश आहे. या मार्गासंदर्भात तयार करण्यात आलेला उपयुक्तता अहवाल आॅक्टोबरमध्ये सादर होणार असून,हा अहवाल स्वीकारल्या गेल्यास अकोला शहर बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे.एचएसआरसी अनेक देशांसोबत बुलेट ट्रेनबाबत काम करीत आहे. केंद्र सरकारने देशातील सहा महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत नियोजन केले असून, या मार्र्गावर बुलेट ट्रेन धावू शकेल काय? याची चाचपणी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी एचएसआरसीला दिली आहे. एचएसआरसीने मुंबई-नागपूर या मार्गाच्या उपयुक्ततेबाबतचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आॅक्टोबरमध्ये रेल्वे मंत्रालयाला सोपविला जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गावरील स्थानकांमध्ये नाशिक, औरंगाबाद, अकोला व अमरावतीचा समावेश करण्यात आला आहे; मात्र अकोला ते औरंगाबाद दरम्यान मार्ग कसा असेल, याबाबतची माहिती एचएसआरसीने उघड केली नसल्याने या मार्गाबाबतची उत्सुकता कायम आहे. मुंबई-नागपूर व्हाया औरंगाबादमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग ठरविताना एचएसआरसीने औरंगाबाद शहरालाही याच मार्गावर आणण्याची संकल्पना मांडली आहे. या मार्गावर नाशिक, औरंगाबाद, अकोला व अमरावती असे स्थानके संकल्पीत केली आहेत. त्यामुळे विद्यमान मध्यरेल्वे मार्गावरील नाशिक ते अकोला दरम्यानची महत्त्वाची शहरे बुलेट ट्रेनला मुकणार आहेत. मराठवाड्याला विदर्भ जोडणारमध्यरेल्वेच्या विद्यमान मार्गानेच बुलेट ट्रेन धावल्यास अकोला-औरंगाबाद या मार्गासाठी नव्याने चाचपणी करण्याची गरज नव्हती; मात्र महत्त्वाची शहरे या ट्रेनच्या मार्गावर आणताना विदर्भासोबतच मराठवाडाही जोडण्याची एचएसआरसीची योजना आहे. अकोला ते औरंगाबाद या मार्गासाठी शेगाव स्थानकावरून खामगाव, जालना व पुढे औरंगाबाद असा पर्याय समोर येऊ शकतो.
अकोलाही बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:32 AM