- प्रविण खेते
अकोला : काही जिल्हे वगळल्यास राज्यातील बहुतांश भागांत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, यापूर्वी राज्यात येऊन गेलेल्या कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये राज्यातील सुमारे १ लाख ४१ हजार ३१७ रुग्णांना जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या ठाणे मंडळात झाली, तर सर्वांत कमी मृत्यू अकोला मंडळात झाल्याचे आकडे सांगतात. या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आकडे प्रसिद्ध केले आहेत. ‘ओमायक्रॉन’ने संकट वाढवले असले, तरी अजूनही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय घटली आहे, मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. ही गती संथ असली, तरी चिंता वाढविणारी आहे. राज्यात सद्य:स्थितीत कोरोनाचा मृत्युदर २.१२ टक्क्यांवर आहे. विदर्भात आतापर्यंत सुमारे २० हजार ५३९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अकोला मंडळातील मृतांची संख्या ६ हजार २६८ असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा आकडा सर्वांत कमी आहे. अकोला मंडळामध्ये अकोला ग्रामीण ६५५, अकोला महापालिका ७७३, अमरावती ग्रामीण ९८९, अमरावती महापालिका ६०९, यवतमाळ १८००, बुलडाणा ८०५ आणि वाशिम जिल्ह्यात ६३७ जणांच्या मृत्यूंची नोंद आहे.
आरोग्य मंडळनिहाय मृतांची संख्या
मंडळ - मृतांची संख्या
ठाणे - ३६,०६४
नाशिक - २०,१९७
पुणे - ३१,८३८
कोल्हापूर - १५,४२३
औरंगाबाद - ७,२२०
लातूर - ९,९२५
अकोला - ६,२६८
नागपूर - १४,२७१
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असून मृत्यूच्या सत्रालाही ब्रेक लागला आहे. असे असले, तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. बेफिकिरी बाळगून कोरोनाला निमंत्रण देऊ नका. कोरोनाचे नियम पाळा. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला