Akola Crime : सावकारीच्या जाचातून शेतकऱ्यांची अद्याप सुटका झाली नसल्याचे पाहायला मिळतंय. अकोला जिल्ह्यात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून छापा टाकून झाडाझडती घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यात शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आठवड्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही निषेध नोंदवला आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मनब्दा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मनब्दा गावातील गतमने कुटुंबीय आणि सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांच्यात शेतीच्या ताब्यावरुन वाद सुरु होता. हे प्रकरण न्यायालयात असतानाही सावकार मंगेश आणि निलेश शेळके यांनी गतमने यांना शेतजमिनीवर ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच संदीपचे वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात सावकारासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सावकारांसोबत तरी सेटलमेंट करु नक; विजय वडेट्टीवारांची टीका
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी "सेटलमेंट" करू नये!," असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात कर्जाची परतफेड करु न शकल्याने सावकारांकडून जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत छापेमारी करण्यात येत आहे. पथकांनी कारवाई करून सावकारांकडून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच असे काही प्रकार होत असल्यास सहकार विभागाकडे तक्रार करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे.