सचिन राऊतअकोला, दि. ५ : शेतातील विहिरीवरील स्प्रिंकलर नोझल, स्प्रिंकलर पाइप, अँल्युमिनियमचे पाइप दुचाक्यांचे अँल्युमिनियम आणि तांबे यासह तांब्याचे भांडे व कॉपर चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून हे महागडे साहित्य जिल्हय़ातील काही ठिकाणी खरेदी-विक्री क रण्यात येत असल्याच्या संशयावरून अकोला पोलिसांनी जिल्हय़ातील भांडे व्यापार्यांची माहिती मागविली आहे. यामधील काही भांडे व्यापारी पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.शहरासह जिल्हय़ात दुचाकी चोरीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या आहेत. या चोर्यांसोबतच घरातील तांबे, पितळ, अँल्युमिनियमच्या भांडे चोरीचाही भुरट्या चोरट्यांनी सपाटाच लावला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ आणि भारत संचार निगम लिमिटेडचे कॉपरचे तार आणि तांब्याचे वायर चोरट्यांकडून मोठय़ा प्रमाणात चोरी करण्यात येत आहेत. दुचाक्यांचे तांब्याचे आणि अँल्युमिनियमचे स्पेअर पार्ट जिल्हय़ातील काही भांड्यांचा भंगार व्यवसाय करणारे व्यापारी खरेदी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून अकोला पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्हय़ातील चोरीचे भांडे खरेदी-विक्री करणार्या भांडे व्यापार्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठय़ा भांडे व्यापार्यांची आणि भांड्याचा भंगार व्यवसाय करणार्या व्यापार्यांची एका विशेष आराखड्यात माहिती गोळा करण्याचे काम अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. अँल्युमिनियम, तांबे, कॉपर हे भांडे बाजारात मोठय़ा महागड्या किमतीने विकल्या जातात; मात्र हाच चोरीचा माल व्यापार्यांकडून अध्र्या किमतीमध्ये खरेदी करण्यात येत असून त्यानंतर त्यापासून विविध भांडे तयार करण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दुचाक्यांचे चेसीस पाण्यात फेकल्या जाते तर इतर सर्व लोखंड, अँल्युमिनियम आणि तांबे याचे पाणी करून ते भांडे बनविण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती आहे. याच माहितीच्या आधारे अकोला पोलिसांनी जिल्हय़ातील भांडे व्यापार्यांची सखोल चौकशी सुरू केली असून त्यांची सर्वच माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.
अकोला जिल्हय़ातील भांडे व्यापारी पोलिसांच्या रडारवर!
By admin | Published: August 06, 2016 2:06 AM