- सचिन राऊत
अकोला, दि. 10 - मुंबईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेल्या किडनी तस्करी रॅकेटमधील पाच डॉक्टरांना २३ दिवसांच्या आतच मुंबई पोलिसांनी अटक केली; मात्र डिसेंबर २०१५ मध्ये अकोल्यात उघड झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोला किडनी रॅकेटचा पर्दाफाश होऊन नऊ महिने उलटल्यावरही या रॅकेटमधील एकाही डॉक्टरवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. किडनी प्रत्यारोपणाचे अकोल्यातील तीन जणांचे प्रस्ताव त्रुटीत असतानाही औरंगाबाद येथील बजाज हॉस्पिटलचे डॉक्टर आणि आरोग्य खात्यातील बड्या अधिकाºयांच्या संगनमताने त्या तिघांच्या किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले; मात्र त्यानंतरही दोषी डॉक्टर मोकाट आहेत.
मुंबईतील वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाºया हिरानंदानी हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटप्रकरणात पोलिसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित चॅटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ. अनुराग नाईक, डॉ. मुकेश शेट्ये, डॉ. मुकेश शहा आणि डॉ. प्रकाश शेट्टी यांचा समावेश आहे. मात्र, अशाच प्रकारे अकोल्यातील अनेकांचे अवैधरीत्या किडनी प्रत्यारोपण करणाºया औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि श्रीलंकेतील कोलंबो येथील डॉक्टरांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. अकोल्यातील जुने शहर आणि डाबकी रोड पोलीस स्टेशन या दोन ठिकाणी किडनी तस्करी प्रकरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. डाबकी रोड पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असून, यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर तब्बल ७०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहे. जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास खदान पोलिसांनी पूर्ण केला. मात्र, त्यानंतर आता हा तपास अमरावती गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे. खदान पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण केल्याचे उघड झाले आहे, तर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात कोलंबो येथील हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण झाल्याचे समोर आले. मात्र, त्यानंतरही या प्रकरणातील डॉक्टरांवर अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार (व्होटा) कारवाई करण्यासाठी अकोला पोलिसांनी आरोग्य संचालकांकडे गत आठ महिन्यांपासून परवानगीचे पत्र सादर केले आहे. मात्र आरोग्य खात्यातील बड्या अधिकाºयांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याने डॉक्टरांवर व्होटानुसार कारवाई करण्यास आरोग्य संचालकांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. मुंबईतील किडनी रॅकेटप्रकरणात डॉक्टरांना तत्काळ अटक झाल्याने आता अकोला किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टरांनाही लवकरच बेड्या ठोकण्याची मागणी पीडितांनी केली आहे.