अकोला, दि. ४- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी असल्यास त्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासह निवडणुकीच्या विविध विषयांचा मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शनिवारी आढावा घेतला. त्यांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारणे, त्यांची पडताळणी करणे आदी विविध कामांसाठी झोननिहाय पाच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे गठन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३ फेब्रुवारी) पाच झोन कार्यालयांमध्ये ६८८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया ४ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यापूर्वी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकार्यांची व मनपा कर्मचार्यांची बैठक घेतली. यावेळी उमेदवारांनी सादर केलेले अर्ज, त्यातील त्रुटी, उमेदवारांनी लावलेले एबी फॉर्म या सर्व मुद्यावर निवडणूक निर्णय अधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके, निवडणूक निर्णय अधिकारी संजय खडसे, पी.ए.तट्टे, श्रीकांत देशपांडे, ए.पी.मोहोड, डी.एम. पालोदकर, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, कैलास ठाकूर, सतीश वखारिया आदी उपस्थित होते.
अकोला मनपा आयुक्तांनी घेतला आढावा!
By admin | Published: February 05, 2017 2:42 AM