अकोला : ज्युस सेंटरवर पाणी मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद होऊन चार ते पाच जणांनी मनपातील कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा आवळला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सिंधी कॅम्पजवळील ज्युस सेंटरवर हा प्रकार घडला. याप्रकरणी खदान पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे.महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात मानधनावर काम करणारे कनिष्ठ अभियंता नंदलाल नारायण मेश्राम (४५) हे दुपारी रवी धरमसिंह माहोत (३५) या सहकाऱ्यासह सिंधी कॅम्प परिसरातील मनपा संकुलासमोरील एका ज्युस सेंटरवर गेले. या ठिकाणी त्यांनी आरोपी मोहसिन मजिद खान (३०) याच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मोहसिनने पाणी देण्यास नकार दिल्याने, मेश्राम यांनी तू मला ओळखत नाहीस का, मी महापालिकेतील अधिकारी आहे, असे सांगितले. त्यावर मोहसिन मजिद खान, त्याचा भाऊ जावेद मजिद खान (३२) यांनी मेश्राम यांच्याशी वाद घातला. त्यातून मोहसिन, जावेद आणि त्यांच्या ज्युस सेंटरवर काम करणाऱ्या नदीमसह आणखी दोघांनी नंदलाल मेश्राम यांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा दाबला. यात मेश्राम यांचा मृत्यू झाला. रवी माहोत यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.आरोपींवरील कारवाईसाठी मृतदेह ठाण्यातनंदलाल मेश्राम यांची क्षुल्लक कारणावरून हत्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी मेश्राम यांचा मृतदेह खदान पोलीस ठाण्यात आणला होता. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह उचलला.
अकोला मनपाच्या अभियंत्याची हत्या
By admin | Published: March 26, 2016 1:26 AM