मुंबई – सोशल मीडियावर गाजणारं जुन्नर येथील अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. खासदार उदयराजे पाठोपाठ छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे.अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे अशा शब्द दिला आहे.
याबाबत संभाजीराजे म्हणाले की, आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. अशा प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पोलीस प्रशासनाने या घटने कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? अक्षय बोऱ्हाडेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.
दरम्यान, अक्षयच्या कामाचं मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे असं स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून या युवकास न्याय मिळवून द्यावा. सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे परंतु कोण राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलित करणारे असतील असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.